“गणेशोत्सव शांततेत व पर्यावरणपूरक साजरा करण्याचे आवाहन – उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत”
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड (ता. माण) : प्रतिनिधी
“गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात उत्साह, भक्तीभाव आणि एकत्रितपणाचा संदेश देणारा गणेशोत्सव यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. मात्र, आनंदात अडथळा येऊ नये आणि कायदा-सुव्यवस्था राखली जावी, “उत्सव आनंदात पार पडावा, पण नियमभंग सहन केला जाणार नाही,” असा ठाम संदेश उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांनी दिला.
आगामी गणेशोत्सव २०२५ शांततेत, सुव्यवस्थित व पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्यासाठी जोगेश्वरी मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, अपर तहसीलदार सौ. मीना बाबर यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, पोलीस पाटील, शांतता समिती सदस्य, गणेश मंडळ पदाधिकारी, डॉल्बी चालक-मालक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंडळाला मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत पुढे म्हणाले की, मिरवणुकीदरम्यान प्लाझमा, बीम लाईट, लेझर बीम लाईट आणि प्रेशरमिड या प्रखर प्रकाशयंत्रांवर संपूर्ण बंदी राहील. आरोग्याला हानीकारक व कर्णकर्कश आवाज करणाऱ्या या साधनांमुळे नागरिकांना धोका निर्माण होतो, त्यामुळे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत आदेश जारी करण्यात आला आहे. डीजेचा वापर आवाज मर्यादेत करता येईल, मात्र आक्षेपार्ह गाणी, घोषणा व संदेश टाळणे बंधनकारक असेल. गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, नियम पाळणाऱ्या मंडळांचा सत्कारही प्रशासन करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी अपर तहसीलदार सौ. मीना बाबर यांनी मंडळांना पर्यावरणपूरक गणपती बसवण्याचे, स्वयंसेवकांना आयकार्ड देण्याचे, धार्मिक तेढ न घालणारे देखावे व समाजप्रबोधनपर उपक्रम राबवण्याचे आवाहन केले. विसर्जनावेळी पोलिस प्रशासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे अनिवार्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी शहरातील गणेश मंडळांनी वाहतूक कोंडी होणार नाही अशा ठिकाणी मंडप उभारावेत, सजावट प्लास्टिकविरहित व पर्यावरणपूरक असावी, तसेच समाज प्रबोधन करणारे संदेश देण्यावर भर द्यावा, असे निर्देश दिले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी शासनाने आखून दिलेली नियमावली वाचून दाखवली. यात गणेश मंडळांची नोंदणी, मिरवणूक ठराविक मार्गाने व शिस्तबद्ध पद्धतीने काढणे, योग्य मूर्तींचा वापर करणे आणि डीजे आवाज मर्यादा पाळणे यासंबंधी सूचना देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सचिन मेनकुदळे यांनी केले तर आभार गोपनीय चे अभिजित भादूले यांनी मानले

* यावेळी लातूरहून नुकतेच बदली होऊन आलेले नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांचा सपोनि अक्षय सोनवणे व सर्व पोलीस कर्मचारी म्हसवड यांचे तर्फे सत्कार करण्यात आला

*, सौ. हर्षदा अजित शिर्के -पाटील (भाटकी) यांची सातारा जिल्हा महिला आघाडी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा नूतन पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी सावंत साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

