कोरेगावात माजी सैनिकाच्या अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया; आरोपीला तात्काळ अटक व मुलीचा शोध घेण्याची मागणी

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

कुलदीप मोहिते
कोरेगाव (प्रतिनिधी):
कोरेगाव तालुक्यातील माजी सैनिकाच्या अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी सैनिक फेडरेशन व माजी सैनिक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाला निवेदन दिले आहे. शुक्रवार, दि. 10 एप्रिल 2026 रोजी कोरेगाव येथील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना हे निवेदन सादर करण्यात आले.

कोरेगाव येथील माजी सैनिक श्री. लक्ष्मण नवनाथ जगताप यांच्या अल्पवयीन मुलीचे दि. 11 मार्च 2026 रोजी अतिश मुकुंद जावळे याने एकतर्फी प्रेमातून कोयत्याचा धाक दाखवून अपहरण केल्याची तक्रार करण्यात आली आहे. याबाबत दि. 12 मार्च रोजी कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे (LCB, सातारा) वर्ग करण्यात आले आहे.

मात्र, एक महिना उलटूनही मुलीचा शोध लागलेला नसून आरोपी अद्याप फरार आहे. तसेच या प्रकरणात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल न केल्याबाबत माजी सैनिक व संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पोलिस प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

या घटनेच्या निषेधार्थ सैनिक फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष माजी सैनिक प्रशांत कदम, कोरेगाव तालुका माजी सैनिक संघटना अध्यक्ष नि. सुभेदार मेजर अशोक नलवडे यांच्या नेतृत्वाखाली माजी सैनिक व नागरिकांनी एकत्र येत प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली.

निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, फरार आरोपीला तात्काळ अटक करून मुलीचा शोध लावावा. अन्यथा कोरेगाव तालुक्यात माजी सैनिकांच्या वतीने रास्ता रोको व ‘सैनिक आक्रोश मोर्चा’ काढण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या परिस्थितीस संपूर्णपणे पोलीस प्रशासन व शासन जबाबदार राहील, असेही नमूद करण्यात आले.

या प्रसंगी प्रशांत कदम, अशोक नलवडे, यशवंत शिंदे, दत्ता माळी, ॲड. राजेंद्र कदम, संतोष भोसले, रामचंद्र इंगळे, सागर सुतार, नि. कॅप्टन अंकुश जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय व पदाधिकारी उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *