मृत्यूच्या उंबरठ्यावरही दातृत्वाचा दीप — नीलम शिंदे यांची प्रेरणादायी कहाणी
व्हिजन २४ तास न्यूज
कराड (प्रतिनिधी) कुलदीप मोहिते :
वडगाव (उंब्रज) येथील ३५ वर्षीय नीलम तानाजी शिंदे यांनी मृत्यूच्या उंबरठ्यावर उभे राहूनही मानवतेचा दीप प्रज्वलित ठेवत दातृत्वाची अमर मिसाल घालून दिली. जीवनाशी तब्बल १४ महिने झुंज देत अखेर त्यांचे निधन झाले, मात्र त्यांच्या अवयवदानामुळे अनेकांना नवजीवन मिळाले.
१४ फेब्रुवारी २०२५ रोजी अमेरिकेत झालेल्या भीषण अपघातात नीलम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. कॅलिफोर्नियातील रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, परंतु त्या कोमातून बाहेर येऊ शकल्या नाहीत. उपचार सुरू असताना संसर्गामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली. २८ मार्चनंतर परिस्थिती गंभीर बनली आणि अखेर त्यांची जीवनाशी सुरू असलेली झुंज संपली.
नीलम यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, त्यांनी जिवंतपणी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे त्यांच्या जाण्याला एक वेगळे, प्रेरणादायी रूप मिळाले. कुटुंबीयांनी अत्यंत धैर्याने त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करत मानवतेचा खरा अर्थ जपला.
दरम्यान, मुलीच्या उपचारासाठी अमेरिकेला जाण्यासाठी वडिलांना व्हिसासाठी मोठा संघर्ष करावा लागला, ही बाबही मन हेलावून टाकणारी ठरली. अखेर भारतीय वेळेनुसार ८ एप्रिल रोजी रात्री अमेरिकेत हिंदू परंपरेनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही जबाबदारी अमेरिकेत असलेल्या त्यांच्या आत्याने पार पाडली.
“नीलम गेली, पण तिच्या अवयवदानामुळे अनेकांचे आयुष्य उजळणार आहे, हेच आमच्यासाठी समाधान आहे,” अशा शब्दांत कुटुंबीयांनी भावना व्यक्त केल्या.
नीलम शिंदे यांची कहाणी ही केवळ एका अपघाताची नाही, तर ती जिद्द, कुटुंबियांचे नाते आणि मृत्यूच्या उंबरठ्यावरही इतरांसाठी जगण्याची प्रेरणा देणाऱ्या दातृत्वाची आहे.
अवयवदान हेच खरे जीवनदान आहे, याची जाणीव करून देणारी ही घटना समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

