प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे प्रयत्न हवेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिली विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
मुंबई, :
– प्रदूषणमुक्त महाराष्ट्र व्हावा, यासाठी सर्वांचे प्रयत्न अपेक्षित आहेत. वाढती प्रदूषण पातळी रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत. पर्यावरणपूरक भूमिका घेऊन प्रदूषण वाढणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे ‘प्रदूषणमुक्त दीपावली संकल्प अभियान – २०२३’ अंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, अल्पसंख्यांक व पणन मंत्री अब्दुल सत्तार, मुख्य सचिव मनोज सौनिक, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, जगभरात सध्या पर्यावरण हा गंभीर विषय आहे. वाढते तापमान आणि या घातक परिणामांची चर्चा सध्या जगभरात सुरु आहे. अशावेळी पर्यावरणपूरक भूमिका घेणे आवश्यक आहे. त्याचमुळे राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात वृक्षलागवडीला प्रोत्साहन दिले आहे. बांबू लागवडीसाठी अनुदान दिले जात आहे. याशिवाय, स्वच्छ भारत अभियानासारख्या मोहिमेतून पर्यावरण संवर्धनासाठी काम केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
शालेय विद्यार्थ्यांनी एखादी गोष्ट मनावर घेतली की त्या कुटुंबात पालकही त्याचे अनुकरण करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला, तर तो निश्चितपणे सर्वांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला. ही दिवाळी सर्वांना आरोग्यदायी आणि आनंदाची जावो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह मान्यवरांनी प्रदूषणमुक्त सण साजरे करण्याबाबत विद्यार्थ्यांना संकल्प करण्याची शपथ दिली.
कार्यक्रमाच्या स्वागतपर प्रास्ताविकात पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव श्री. दराडे यांनी प्रदूषणमुक्त दीपावली संकल्प अभियान -२०२३ राबविण्यामागील भूमिका समजावून सांगितली. गेल्या काही वर्षात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या व्यापक जनजागृतीमुळे फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी आजही याबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती करण्याची नितांत गरज आहे. त्याच उद्देशाने मंडळामार्फत दरवर्षी विविध उपक्रम हाती घेतले जातात. फटाक्यांमुळे होणारे हवा आणि ध्वनीचे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्पना राबविली जाते. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत त्याचे महत्व पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.