माण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदर्श गाव लोधवडेची कुमारी आकांक्षा विठ्ठल वायदंडे ह्या विद्यार्थ्यांनीची भारतीयअवकाश संशोधन संस्था ISRO इस्रो बंगळूर येथे शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्तेच्या निकषावर तिची सातारा जिल्हा परिषदे मार्फत१४फेब्रुवारी ते१७ फेब्रुवारी २०२४ या कालखंडातील अभ्यास दौऱ्यासाठी गुणवंत व प्रतिभावंत विद्यार्थीनी म्हणून निवड झाली आहे.
कुमारी आकांक्षा ही एका सामान्य कुटुंबातील मुलगी आहे.तिच्या घरची परिस्थिती अतिशय गरीब आणि हलाखीची आहे.परंतु तिच्या अंगी जिद्द व चिकाटी आहे.तिच्या मनाची कायम मेहनत घेण्याची तयारी असते. तिने आजवर अनेक प्रकारच्या कला,क्रीडा व विविध स्पर्धांच्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन,त्या स्पर्धांच्यामध्ये विविध पातळीवर चांगले घवघवीत उज्जवल यश मिळविले आहे.त्या स्पर्धांमध्ये तिने चमकदार कामगिरी केली आहे.
तिचा सुरुवातीचा शिक्षणाचा श्रीगणेशा सुरू झाल्यापासून तिला मा.सतेशकुमार मारुती माळवे सरांनी दीपस्तंभासारखे मोलाचे मार्गदर्शन आणि सर्व प्रकारचे सहकार्य केले आहे.ती पहिली पासूनची त्यांची विद्यार्थीनी आहे.त्यांनी आजवर तिच्या शिक्षण कार्यात खूप प्रेरणा दिली आहे.शिक्षणासाठी ते तिच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहिले आहेत. शिक्षण कार्यासाठी त्यांनी तिला दत्तक घेऊन अनमोल साथ दिली आहे. तिची गरीब परिस्थिती असली तरी त्यांनी शिक्षण कामी तिला आजवर कोणत्याही व कसल्याही प्रकारची अडचण येऊ दिली नाही. निबंध,हस्ताक्षर,कला व क्रीडा क्षेत्रातही तिने विविध स्तरावर अनेक वेळा दमदार आणि वेगवान अशी कामगिरी केलेली आहे.
तिला सतेशकुमार माळवे सरांनी सतत प्रेरणा देऊन,विविध स्पर्धांतील कामगिरीसाठी कायम समर्थ साथ दिली.तिचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी त्यांनी अगदी खूप शर्थीचे प्रयत्न केले आहेत.इस्रो अभ्यास दौऱ्याच्या सहलीच्या माध्यमातून निवड झाल्याने खऱ्या अर्थाने तिच्या व शिक्षकांच्या कष्टाचे चीज झाले आहे.एका सामान्य कुटुंबात जन्म घेतलेली ही लोधवडे गावची सुकन्या बंगळूर इस्रो अवकाश संशोधन संस्थेत शासकीय अभ्यास दौऱ्यातून सहलीसाठी जात असल्याने खरोखरीच शिक्षण क्षेत्रासह अन्य क्षेत्रातील मान्यवर व अधिकारी वर्ग,शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक ,सर्व गुरुजन वर्ग, विद्यार्थी, पालक वर्ग आणि आदर्श लोधवडे गावातील ग्रामपंचायत व विविध संस्था पदाधिकारी आणि असंख्य ग्रामस्थांना मनस्वी असा खूप आनंद झाला आहे.सध्या मार्गदर्शक शिक्षक व तिच्यावर सर्वच क्षेत्रातून चौफेर असा अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. बंगळूर येथील इस्रो अभ्यास दौऱ्याच्या सहलीसाठी तिला अनेकजण शुभेच्छा देत आहेत.