यशस्वी जीवनासाठी ध्येय निश्चिती करा……….प्रतीक इंदलकर.
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड ..प्रतिनिधी
यशस्वी जीवनासाठी ध्येयनिश्चिती करणे महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेतून भारतीय वन सेवेमध्ये निवड झालेले प्रतीक प्रकाश इंदलकर यांनी म्हसवड येथे व्यक्त केले.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे केंद्रीय लोकसेवा आयोग संचलित भारतीय वनसेवे मध्ये प्रतीक प्रकाश इंदलकर यांची निवड झाल्याबद्दल यांचा सत्कार आयोजित केला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर होते.यावेळी राज्य महसूल उपसचिव प्रकाश इंदलकर,
मुख्याध्यापिका राजकुमारी इंदलकर, संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, राजेवाडी सरपंच प्रशांत शिरकांडे, प्राचार्य विठ्ठल लवटे, प्रज्वल इंदलकर,इत्यादी मान्यवर उपस्थित होते
या वेळी बोलताना प्रतीक इंदलकर म्हणाले आज माझ्या आयुष्यातील एक सर्वोच्च आनंदाचा क्षण असून थोर क्रांतिवीराचे नाव असणाऱ्या क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात माझा सन्मान होत आहे.माझ्या यशामध्ये माझे आई-वडील,नातेवाईक व सर्व गुरुजनांचा महत्त्वाचा वाटा आहे.मी स्वतः अभ्यास केला मात्र मला प्रेरणा देण्याचे काम वरील सर्व मान्यवरांनी केले. आज होत असलेला सन्मान हा माझ्याबरोबरच माझ्या गुरुजन व आई-वडिलांचा सन्मान असल्याचे प्रतीक इंदलकर यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले जीवनात शालेय स्तरापासूनच ध्येय निश्चिती करा. वेळ व अभ्यासाचे नियोजन करा.जिद्द चिकाटी ठेवा. अवांतर वाचन हा स्पर्धा परीक्षेतील अविभाज्य घटक आहे त्यासाठी वाचनाची आवड जोपासा. शरीर हीच खरी संपत्ती असूनअभ्यासाबरोबर व्यायाम व खेळाकडे लक्ष देण्याचे आवाहन प्रतीक इंदलकर यांनी केले.यशाचे सर्वोच्च शिखर गाठण्यासाठी शालेय स्तरापासूनच तयारी करण्याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तात्पुरता स्वार्थ पाहण्या ऐवजी चांगल्या मित्राची संगत धरा.आई वडील शिक्षकाचा सन्मान ठेवा,याबाबत मार्गदर्शन करून मी कसा घडलो याचा संघर्ष पट प्रतीक यांनी विद्यार्थ्यास समोर मांडला.ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही कमी नाहीत फक्त गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची आणि ही दूरदृष्टी क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे जोपासली जात असल्याबद्दल त्याने संस्थाअध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर व त्यांच्या सर्व सहकार्यांना धन्यवाद दिले.संस्थेची सर्वांगीण शैक्षणिक प्रगती पाहता संस्थेला उज्वल भविष्य असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.या निमित्ताने प्रतीक इंदुलकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्याशी बातचीत केली.वडीलधाऱ्यांचा सन्मान ठेवा, अहंकाराला बाजूला ठेवा ,जीवन ही एक संधी आहे , त्याचं सोनं करण्यासाठी अभ्यासाच्या माध्यमातून संघर्ष करा , नम्रता व चांगली जिज्ञासा बाळगा,व नेहमी सकारात्मक रहा, यश केवळ आणि केवळ तुमचेच असेल असेही उदाहरणाद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले,त्यास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन यशस्वी सहभाग नोंदविला.
यावेळी राज्य महसूल उपसचिव
प्रकाश इंदलकर म्हणाले अल्पावधीत क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाने खूप मोठी प्रगती केलेली असून विद्यार्थ्यां साठी प्रेरणादायी उपक्रम राबवत असले बाबत व वैशिष्ट्यपूर्ण सोयीसुविधा देत असल्याबद्दल संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर व सुलोचना बाबर तसेच सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले व संस्थेला उज्वल भवितव्य असल्याचेही सांगितले.
यावेळी संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा.विश्वंभर बाबर यांनी प्रतीक इंदलकर यांच्या जिद्द व चिकाटीचे कौतुक करून त्याच्या आगामी सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. माण तालुक्यामधून भारतीय वन सेवेमध्ये पहिल्या प्रयत्नांमध्ये निवड होणारा प्रतीक हा पहिला माणदेशी सुपुत्र असल्याचे प्राध्यापक बाबर यांनी सांगितले .
यावेळी प्रतीकच्या आई मुख्याध्यापिका राजकुमारी इंदलकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून संस्थेच्या दर्जेदार व्यवस्थापनाबद्दल समाधान व्यक्त केले व या संस्थेमधून अनेक प्रतीक निर्माण व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. प्राचार्य विठ्ठल लवटे यांनी संस्थेच्या प्रगतीचा अहवाल स्पष्ट करून प्रस्ताविक केले. यावेळी क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापिका वृषाली सावंत यांनी केले तर उपस्थितचे आभार प्राध्यापक समाधान चव्हाण यांनी व्यक्त केले.