मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते तहसीलदार सचिन खाडे यांचा गौरव बीड जिल्ह्याच्या गेवराईतील मनरेगाची कामे प्रगतीपथावर
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
By :दौलत नाईक
दहिवडी/प्रतिनिधी:
शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी जे फायद्याचे उद्योग आहेत ते सुरु करण्यात यावेत. लोकांनी नोकरी करण्यापेक्षा घरची भाकरी खाऊन शेतीपूरक व्यवसाय केल्यास त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल. तसेच ते स्वतःच्या कुटुंबासोबत राहून स्वतःचे पिक, उत्पादन घेतील, त्याचे मार्केटींग करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत केली जाईल. काम मागण्यापेक्षा काम देणार्याचे हात पुढे आले पाहिजेत ते हात तयार करा असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मुंबई येथे मनरेगा आणि विविध विभागांच्या योजनांचे अभिसरण करून सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबविणे आणि सर्वांगीण ग्रामसमृद्धी योजनेच्या आयोजित शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
दरम्यान, माण तालुक्यातील पळशी गावच्या सुपुत्रांनी वेगवेगळ्या क्षेत्रात ठसा उमटवून नावलौकिक मिळवला आहे. पळशी गावचे गावचे सुपुत्र अन बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याचे तहसीलदार सचिन खाडे यांनी गेवराई तालुक्यात रेशीम उत्पादनात बीड जिल्ह्यात सर्वात जास्त ३१८ कामे पूर्ण करून प्रगती पथावर आणली आहेत. सदरच्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते व रोजगार हमी आणि फलसंवर्धन मंत्री संदीपान भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार सचिन खाडे व सहकारी यांना ‘उत्कृष्ट कार्या’बद्दल गौरविण्यात आले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यातून तुती लागवड करून रेशीम व्यवसाय वृद्धिंगत करण्यात येत आहे. यामध्ये बीड जिल्हा अंतर्गत गेवराई तालुक्यात सर्वात जास्त ३१८ कामे पूर्ण करून प्रगतीपथावर आणल्यामुळे या ‘उत्कृष्ट कार्या’बद्दल तहसीलदार सचिन खाडे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी विनीत पवार, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रशांत कोकुडे यांचा गौरव करण्यात आला. या गौरव व सन्मानामुळे त्यांचे माण तालुक्यातील विविध स्तरातून कौतुक होऊन अभिनंदन करण्यात येत आहे.