राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्ह्यात दोन हजाराहून अधिक प्रकरणे निकाली – जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण कि. नरडेले
व्हिजन २४ तास न्यूज
BY ; Ahmad Mulla
सांगली :
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. लोकअदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणे, दावापूर्व प्रकरणे, स्पेशल ड्राईव्हमध्ये, अशी एकूण २ हजार २७० प्रकरणे निकाली करण्यात आली. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण कि. नरडेले यांनी दिली.
लोकन्यायालयाचे आयोजन प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आर.के. मलाबादे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. लोकअदालमध्ये न्यायालयातील दिवाणी व फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे तसेच राष्ट्रीयकृत बॅंका व इतर वसुलीची प्रकरणे तसेच सहकार, कामगार, औद्योगिक, ग्राहक न्यायालयाची प्रकरणे ठेवण्यात आली होती. सांगली जिल्ह्यामधून एकूण रक्कम ३५ कोटी ९६ लाख ४७ हजार ८३५ इतक्या रक्कमेची प्रकरणे तडजोड करण्यात आली.
लोकअदालत दिवशी जिल्हा न्यायाधीश एस.आर.भदगले, पी.बी.जाधव, एस.पी.पोळ, डी.एम. पाटील व इतर न्यायीक अधिकारी उपस्थित होते. लोकअदालत यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण कि. नरडेले यांनी उपस्थित सर्व पक्षकार, न्यायिक अधिकारी, सरकारी वकील, वकील बारचे अध्यक्ष व सदस्य या सर्वांचे आभार मानले. लोकअदालतीचे नियोजन जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक व्ही. व्ही. कुलकर्णी, सहाय्यक सचिन नागणे व नितीन आंबेकर यांनी केले. लोकअदालतीस पक्षकारांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये होता.