माण तालुक्यात प्रथमच धरणीकंप* कोयनेच्या भूकंपमापन केंद्रात 3.6 रिष्टर स्केलची नोंद,आवाजाने नागरिकांमध्ये घबराट,दिवसात तीनवेळा धक्के जाणवले
व्हिजन 24 तास न्युज म्हसवड
दौलत नाईक*
दहिवडी/प्रतिनिधी:
माण तालुक्यामध्ये आज सकाळी आणि दिवसभरात तीन वेळा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. यामुळे भूकंपाच्या धक्क्याने माण तालुका हादरण्याची ही पहिलीच घटना घडली आहे. या भूकंपाचे मापन कोयनेच्या भूकंपमापन केंद्रात 3.6 रिश्टर स्केल एवढे नोंदवले गेले आहे तर पळशी धामणी परिसराच्या पाच किलोमीटर खोल जमिनीत केंद्र असल्याची माहिती मिळाली. या धक्क्याने संपूर्ण परिसर हादरून गेला तर नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली.
माण तालुक्यातील ढाकणी धामणी पळशी या परिसरात आज सकाळी साडे दहा, दुपारी १२.५० व सायंकाळी ४.५० वाजता हे धक्के जाणवले. या धक्क्यांची तीव्रता एवढी होती की परिसरातील 15 ते 16 घरांना भूकंपामुळे तडे गेले. यासोबतच अनेकांच्या घरात फळ्यांवर आणि कपाटावर ठेवलेली भांडी धडाधड कोसळली. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
माण प्रशासनाकडे भूकंपमापनाची कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्याने सदर भूकंपाची नोंद आणि भूकंप केंद्र हे कराडच्या कोयना भूकंपमापन केंद्रातून माहिती समजली. स्थानिक रहिवाशांनी व मिळालेल्या माहितीनुसार भूकंपकेंद्र हे पळशी धामणी व ढाकणी परिसरात असल्याचे समजते.सुदैवाने या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. धामणी गावामध्ये विष्णू रामहरी खाडे, विजय उत्तम खाडे जयराम गोरड, प्रकाश खाडे यांच्या घराला तडे गेले आहेत. तर डॉ. श्रीकांत खाडे यांच्या घराला तडे जाऊन घरातील पियुपी केलेले छत खाली पडले तर भिंतीला लावलेला टीव्ही संच हादर्याने निखळला. पळशी येथील टिल्लू भोजने,विजय कदम यांच्या घराच्या भिंतीला तडे गेले व संदीप माळवे यांच्या घराची भिंत पडली आहे.
प्रतिक्रिया: जमिनीला मोठा हादरा बसून आवाज झाला, मात्र आम्हाला सुरवातीला हा आवाज व हादरा भूसुरुंगाचा स्फोटाचा असावा असे वाटले. तसेच उरमोडी कालव्याचे परिसरात काम चालू आहे तेथे भूसुरुगांचा स्फोट झाला असावा यासाठी आम्ही नागरिकांनी या कालव्यावर फिरून पाहणी केली. मात्र परिसरात कोठेही भूसुरुंगाचा स्फोट करण्यात आला नसल्याची माहिती मिळाल्यानंतर भूकंप झाला असल्याची आम्हाला उशिरा माहिती मिळाली ,अखेर हा भूकंप झाला असल्याची खात्री पटली. प्रकाश खाडे- सामाजिक कार्यकर्ते धामणी.