आ. जयकुमार गोरे भाऊ बॅक इन ॲक्शन …!*
व्हिजन २४ तास न्यूज म्हसवड
By; Ahmad Mulla
अजिंक्य सह्याद्री विशेष ( सम्राट गायकवाड) :
संघर्षातून कर्तृत्व सिद्ध करत मार्गक्रमण करणारे माण – खटाव मतदारसंघाचे तडफदार आमदार व भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे पुन्हा एकदा जिल्हा स्तरावर आपला झंझावात निर्माण करण्यासाठी सक्रिय झाले असल्याचे आज दिसून आले. साताऱ्यात भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासोबत आज ( मंगळवार) प्रदीर्घ बैठक घेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले असल्याचे सांगण्यात आले.
फलटण येथे झालेल्या भीषण अपघातात जखमी झाल्यानंतर आ.जयकुमार गोरे तब्बल तीन पेक्षा अधिक महिन्यांच्या कालावधीनंतर मंगळवारी साताऱ्यात विश्रामगृह येथे त्यांचे आगमन झाले. अद्यापही एका पायाची जखम कायम असल्याने आ. जयकुमार गोरे गाडीतून उतरताच जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास व सहकाऱ्यांनी त्यांना हातात हात देत पायऱ्यांवरून पुढे विश्रामगृह येथे घेवून गेले. विशेष बाब म्हणजे आ.जयकुमार गोरे हे साताऱ्यात येणार असल्याची खबर सर्वत्र पोहचल्याने भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्र परिवाराने भेटण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. त्यामुळे साहजिकच विश्रामगृह परिसराला एक यात्रेचे स्वरूप आल्याचे देखील दिसून आले.
आ. जयकुमार गोरे हे दुपारी विश्रामगृह येथे पोहचताच त्यांनी भाजप कोअर कमिटीची बैठक घेतली तर त्यानंतर जिल्हा कार्यकारिणी व सर्व तालुकाध्यक्ष यांच्यासमवेत तब्बल दोन तास बैठक घेतली. बैठकी दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सातारा व माढा लोकसभा मतदारसंघ निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पालिका आणि नगर पंचायत निवडणुका केव्हा ही जाहीर होवू शकत असल्याची शक्यता धरून पदाधिकाऱ्यांना तयारीत राहण्याच्या सूचना देखील आ.गोरे यांनी केल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात भाजपचे आणि शिवसेनेचे प्रत्येकी २ असे एकूण चार आमदार असून शिंदे – फडणवीस यांची ताकद आगामी निवडणुकीत मिळणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत सर्वाधिक स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हापरिषदेवर भगवा फडकवला पाहिजे,असा निश्चय देखील यावेळी करण्यात आल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये उत्साह पाहण्यास मिळाला व आमदार जयकुमार गोरे यांची तिच आक्रमक शैली पुन्हा पाहण्यास मिळाल्याने कार्यकर्त्यांनी ‘ जय हो ‘ च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडल्याचे चित्र पुन्हा एकदा पाहण्यास मिळाले.