प्रगत कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवून त्याला लाभ मिळवून द्या – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज
By:अहमद मुल्ला 
सांगली  :
            कृषी विभागाने प्रगत नवीन कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचवून शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळवून द्यावा. तसेच शेतकऱ्याच्या जीवनात आर्थिक परिवर्तनासाठी कृषी विभागाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज सांगली जिल्हा कृषी महोत्सव उद्घाटन समारंभ प्रसंगी केले.
                कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने नेमीनाथनगर, सांगली येथील कल्पद्रुम ग्राउंडवर आयोजित सांगली जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत संख येथील शेतकरी बसवराज कुंभार व आटपाडी येथील शेतकरी धनश्री खोत यांच्याहस्ते करण्यात आले. सांगली जिल्हा कृषी महोत्सव उद्घाटन समारंभास महापालिका आयुक्त सुनील पवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, कृषी उपसंचालक प्रियांका भोसले, उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ, सागर खटकाळे, कृषी विकास अधिकारी विनायक पवार, स्मार्टचे प्रकल्प संचालक भगवान माने, आत्म्याचे प्रकल्प उपसंचालक बाळासाहेब लांडगे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, शेतकरी व नागरिक उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, नव नवीन योजना, तंत्रज्ञान आत्मसात करून सांगली जिल्ह्याने कृषी क्षेत्रामध्ये आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. भविष्यातही कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर  व्हावा, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी व्यक्त केली. कृषी विभागामार्फत शासनाच्या विविध कृषी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी होण्यासाठी कृषी महोत्सवासारखे उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावतात. कृषी विभागाने कृषी महोत्सवाचे चांगले नेटके आयोजन केले आहे. या पाच दिवशीय कृषी महोत्सवाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी केले.
               कृषी महोत्सवाच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी कृषी विभागाने प्राधान्य द्यावे. यासाठी महापालिकेच्या घंटागाडीचाही वापर करावा. कृषी महोत्सवातून नव्या पिढीला कृषीविषयक योजनांची माहिती मिळणार असल्याने जिल्ह्यातील जनतेने मोठ्या प्रमाणात कृषी महोत्सवास भेट देऊन कृषी योजनांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी यांनी कृषी महोत्सव संदर्भात माहिती दिली. कृषी विभागामार्फत शासनाच्या 118 कृषी योजनांच्या माहितीचा खजाना कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. तसेच प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी यांच्या विचारांची देवाण-घेवाण होऊन प्रगत कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत  पोहोचवण्यास कृषी प्रदर्शनामध्ये विविध कार्यक्रम उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्री. सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले. कल्पद्रुम ग्राउंड, नेमिनाथनगर येथे १७ ते २१ मार्च २०२३ या पाच दिवसाच्या कालावधीत आयोजित कृषी महोत्सव पाहण्यासाठी विनामूल्य असून सकाळी १० ते रात्री 8 वाजेपर्यंत खुला राहणार असल्याचेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी सांगितले
         तत्पूर्वी  जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी कृषी महोत्सवातील विविध स्टॉलना भेटी देऊन स्टॉलची पाहणी केली व स्टॉलधारकांशी संवाद साधला.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!