शालेय विद्यार्थिनीच्या भविष्यातील शारीरिक धोके टाळण्यासाठी किशोरवयीन मुलींना आरोग्य विषयक मार्गदर्शन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर मनिषा विकास बाबर यांनी म्हसवड येथे केले.
कृषि विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतीवीर इंग्लिश मीडियम स्कूल म्हसवड येथे किशोरवयीन मुलींचे आरोग्यविषयक शिबिर आयोजित केले होते .समुपदेशन शिबिरासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ.मनिषा बाबर तर कार्यक्रमाच्याअध्यक्ष म्हणून संस्थेच्या सचिव सुलोचना बाबर उपस्थित होत्या.यावेळी डॉ.मनिषा बाबर म्हणाल्या,जीवनातील किशोरवयीन अवस्था ही एखाद्या आनंदी फूल झाडाप्रमाणे असते.अत्यंत निरागस,स्वच्छंदी अशी ही अवस्था नाजूक व महत्वपूर्ण असते.शालेय स्तरावरील किशोरवयीन मुलींना भविष्यातील अनेक अडचणी व धोक्याची कल्पना योग्यवेळी सांगितली जात नाही त्यामुळे अनेक संकटांना तोंड द्यावे लागते . किशोरवयीन मुलींच्या आरोग्याबाबत शालेय स्तरावर प्रबोधन व जनजागृतीची योग्य वेळी व योग्य व्यक्तीमार्फत होणे गरजेचे आहे.मुलींनी अभ्यासाबरोबरच आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.मुलींनी मासिक पाळीच्या वेळी योग्य व संतुलित आहार घेणे गरजेचे आहे.मुलींच्या वेगवेगळ्या शारिरीक समस्यांकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे.यासाठी मुलींनी आपल्या समस्या आई किंवा शिक्षिका यांना सांगितल्या पाहिजेत .अन्यथा अनेक संकटांना तोंड द्यावे लागेल असा इशारा डॉ.बाबर यांनी दिला.
यावेळी डॉ.बाबर यांनी मुलींच्या आरोग्यावर चढउतार,अनावश्यक भिती,मासिक पाळी व यासंबंधी घ्यावयाची काळजी त्याबाबतचे उपचार,पौष्टिक आहार,जंक फूड खाण्याचे तोटे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. महिला व किशोरवयीन मुलीसाठी शासनाच्या सुद्धा अनेक योजना आहेत त्याचा लाभ घेणे गरजेचे असल्याचे डॉक्टर बाबर यांनी तपशीलवार सांगितले .यावेळी क्रांतिवीर संकुलाच्या सचिव सुलोचना बाबर यांनी किशोरवयीन मुलींचे प्रश्न व योग्य वेळी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले तसेच या शाळेत मुलींच्या साठी विविध उपक्रम राबवली जात असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी इयत्ता ६वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यींनींनी सहभाग घेतला होता.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सुवर्णा दराडे यांनी केले तर पाहुण्यांचे आभार वानिश्री सावंत यांनी मांडले.या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षिका व मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या