श्री सिध्दनाथ व जोगेश्वरी रथ यात्रेसाठी प्रशासन सज्ज, जिल्हाधिकारी डुडी यांचे ठोस नियोजन
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड – प्रतिनिधी
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी देवीच्या रथोत्सवासाठी प्रशासनाने चोख नियोजन केले असून, यात्रेत कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन सुसज्ज करण्यात आले आहे. येत्या २ डिसेंबर रोजी संपन्न होणाऱ्या या भव्य यात्रेसाठी विविध यंत्रणांना निर्देश देण्यात आले असून, जिल्हाधिकारी डुडी यांनी यात्रेला आदर्श स्वरूप देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
प्रशासन सज्ज, भाविकांची गैरसोय होणार नाही
म्हसवड शहरात भरणाऱ्या सिध्दनाथ यात्रेच्या नियोजनाबाबत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, गतवर्षीप्रमाणे यंदाही भाविक व व्यावसायिक यांची कोणतीही गैरसोय होणार नाही. यंदाची यात्रा आदर्श ठरण्यासाठी प्रशासन पूर्ण तयारीत आहे. भाविकांसाठी आरोग्य, वाहतूक, स्वच्छता आणि सुरक्षा यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात असून, प्रत्येक विभागाला योग्य जबाबदाऱ्या दिल्या आहेत.
आरोग्य व्यवस्थेवर विशेष भर
जिल्हाधिकारी डुडी यांनी आरोग्य विभागाला यात्रेदरम्यान प्रभावी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक किलोमीटरवर रुग्णवाहिका तैनात ठेवण्याबरोबरच पालिकेच्या इमारतीजवळ तात्पुरते रुग्णालय उभारण्याचे निर्देश दिले आहेत. या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर, औषधांचा साठा आणि अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतील. याशिवाय म्हसवड आरोग्य केंद्र आणि खासगी रुग्णालयांमध्ये बेड आरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


