राजकीय क्षेत्रातील ऐतिहासिक कार्याबद्दल विधान परिषद सभापती प्रो. राम शिंदे यांचा ‘मीडिया एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ विशेष सन्मानाने गौरव
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
गणेश तळेकर
मुंबई : प्रतिनिधी
राजकीय क्षेत्रात सामाजिक भान जपत आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रो. राम शिंदे यांना माई मीडिया २४ आणि मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने ‘मीडिया एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ चा विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.
प्रो. शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त चौंडी (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथे त्यांच्या ऐतिहासिक कार्याचे शाश्वत स्मरण ठेवण्यासाठी ‘शिल्पसृष्टी’ निर्मितीचा संकल्प केला आहे. या भव्य शिल्पसृष्टीत अहिल्यादेवींच्या न्यायनिवाडे, जलसंधारण, काशीविश्वनाथ व महेश्वर पुनरुत्थान, वृक्षसंवर्धन आदी कार्याचे शिल्पात्मक दर्शन घडवले जाणार आहे.
चौंडीला पर्यटन, अध्यात्म, इतिहास व सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी व्यापक विकास आराखड्याची प्रक्रिया गतीमान करण्यात आली आहे. यामध्ये स्मारकाचे सुशोभीकरण, संग्रहालय, पर्यटक निवास, चौंडीश्वरी मंदिर जीर्णोद्धार, रस्ते व वाहनतळ अशा सुविधा प्रस्तावित आहेत.
या कार्याची दखल घेत ‘मीडिया एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ अंतर्गत प्रो. राम शिंदे यांचा विशेष सन्मानाने गौरव करण्यात आला. कार्यक्रमास ते उपस्थित राहू शकले नाहीत, म्हणून विधानभवनातील त्यांच्या कार्यालयात जाऊन हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला.
या वेळी माई मीडिया चे अध्यक्ष शीतल करदेकर, मुंबई अध्यक्ष चेतन काशीकर, संघटन समन्वयक गणेश तळेकर आणि मुंबई कार्यकारिणी सदस्य विजय कांबळे उपस्थित होते.
याप्रसंगी प्रो. शिंदे यांनी मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया च्या समाजहिताच्या कार्याचे कौतुक करत या संघटनेला आपल्या पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.