रत्नागिरीच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा; ‘मिनी थियेटर’ आज होणार खुले
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
गणेश तळेकर
रत्नागिरी :प्रतिनिधी
रत्नागिरीच्या सांस्कृतिक आणि कला विश्वासाठी एक आनंदाची आणि अभिमानाची बातमी समोर आली आहे. शहरातील वाढत्या सांस्कृतिक गरजा लक्षात घेऊन तसेच स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून रत्नागिरीत सुसज्ज ‘मिनी थियेटर’ उभारण्यात आले आहे. या मिनी थियेटरचे उद्घाटन आज, शनिवार दिनांक ७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता अरिहंत मॉल येथील रत्नागिरी संस्कृत उपकेंद्र येथे संपन्न होणार आहे.
या मिनी थियेटरचे उद्घाटन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. या आधुनिक मिनी थियेटरमुळे रत्नागिरीच्या सांस्कृतिक चळवळीला नवे बळ मिळणार असून स्थानिक कलाकारांना सादरीकरणासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
सुमारे ३०० आसन क्षमतेचे हे मिनी थियेटर लघुनाट्य, नाट्यछटा, सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहसंमेलने तसेच विविध कला कार्यक्रमांसाठी उपयुक्त ठरणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याला कला आणि संस्कृतीची समृद्ध परंपरा लाभलेली असून या नव्या उपक्रमामुळे त्या परंपरेला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
या उद्घाटन सोहळ्यास रत्नागिरीतील नागरिक, कलाकार, रंगकर्मी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

