नुसतेच फलक लावून तालुका जलमय होत नसतो. : रणजितसिंह देशमुख : ट्रिगर वन-टू ची नौटंकी कशाला ?
व्हिजन२४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड :
ज्यावेळी माण – खटावची जनता व शेतकरी आंदोलन करत होती, त्या प्रसंगी येथील लोकप्रतिनिधी व स्वयंघोषीत हवामान खात्याचे मंत्री परतीच्या पावसाचा अंदाज व्यक्त करीत होते. कायम दुष्काळ असणाऱ्या माण – खटावच्या जनतेची अहवेलना झाली असून नुसतेच फलक लावून तालुका जलमय होत नसतो. त्यासाठी जनमाणसात येऊन वस्तुस्थिती व प्राप्त परिस्थितीचे अवलोकन करणे आवश्यक असते.जलनायक म्हणून बिरूदी लावणार्या लोकप्रतिनिधीचे पाण्याबाबत मोठे अपयशच म्हणावे लागेल. राज्यात यापूर्वी दोन्ही तालुके दुष्काळी म्हणून गणलेले असताना पहिल्या यादीत त्याचा समावेश नाही. पिक विम्यातही माण – खटाव ला वगळले असून उपमुख्यमंत्र्यांची भेट म्हणजे उंटावर बसून शेळ्या राखण्याचा प्रकार असल्याचे प्रतिपादन आखील भारतीय कॉंग्रेसचे सदस्य रणजितसिंह देशमुख यांनी केला.
येथील शिवसृष्टी सभागृहात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत देशमुख बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. संतोष गोडसे , राजूभाई मुलाणी , डॉ. महेश गुरव, उपसभापती विजयकुमार शिंदे , युवक जिल्हाध्यक्ष अमरजीत कांबळे, अँड . राजीव चव्हाण , राजेंद्र माने , ज्ञानेश्वर इंगवले ,राहुल सजगणे , इम्रान बागवान आदींची प्रमुख उपस्थिती होती.
देशमुख पुढे म्हणाले की , माण – खटाव तालुक्यात खरीप हंगामात एकवीस दिवसांपेक्षा जादा पावसाचा खंड पडला अशी परिस्थिती असताना ट्रिगर वन का लागू झाला नाही. संबंधीत अधिकाऱ्यांवर दबाव टाकून स्वयंघोषीत जलनायक स्वतः म्हणवून घेतात . ती उपाधी दुष्काळ जाहीर झालातर धोक्यात येईल की काय म्हणून अधिकार्यांना वस्तुस्थिती व परिस्थिती बाबत दिशाभूल केली. यासाठी विविध आयुधांचा वापर केला गेला . खरीपाच्या वेळीच दुष्काळ जाहीर होणे अपेक्षीत होते.शेती पाण्यासह पिण्याच्या पाण्याची तीव्रता लक्षात घेऊन कातरखटाव व दहिवडी येथे कॉंग्रेस कार्यकर्त्यानी आंदोलने केली. यामध्ये त्यांना अटकही झाली. त्या दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची दुष्काळ जन्य परिस्थितीबाबत जिल्हाधिकारींच्या सोबत बैठकही झाली. तदनंतर शेतीपाणी सिंचन आवर्तन व पाण्याचे टँकर ही सुरू झाले.मात्र कालांतराने तेही टँकर बंद झाले. नुसतेच कागदी घोडे नाचवत दोन्ही तालुक्यातील जनतेची दिशाभूल केली असून लवकरच याचा पर्दापाश करणार आहे . दोन्ही तालुके दुष्काळी छायेत होरपळत असून राज्यशासनाने या दोन्ही तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा अन्यथा गुराढोरांना सोबत घेत प्रांत कार्यालयावर धडक देऊ असा इशारा ही यावेळी देशमुख यांनी दिला.
– चौकट –
लोकप्रतिनिधीचे अपयश …
कायम दुष्काळी माण – खटाव तालुक्यात भयावह परिस्थिती असताना सुरु असलेल्या नौटंकीचे पितळ उघडे पडणार असे दिसून येताच ट्रिगर वन टू चे चित्र समोर आणत आहेत त्यामुळे येथील लोकप्रतिनिधीचे अपयश लपले नसल्याची टिका जेष्ठ नेते राजूभाई मुलाणी यांनी केली .