जिद्दीची लढाई : ‘आरोग्य मित्रा’च्या संकल्पनेतून खटावमध्ये उभारतंय कॅन्सर हॉस्पिटल
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड, दि. ६ (अहमद मुल्ला)
आजच्या धावपळीच्या आणि फास्टफूडच्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून कर्करोगासारख्या आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मात्र, “कर्करोगाला घाबरू नका, त्याच्याशी लढा” असा सकारात्मक संदेश देत म्हसवडचे आरोग्य मित्र इंजिनिअर नितीन तिवाटणे यांनी माण -खटाव तालुक्यात कॅन्सर रुग्णांसाठी मोठा उपक्रम हाती घेतला आहे.
आईच्या कर्करोगामुळे झालेल्या दुःखद अनुभवातून प्रेरणा घेत तिवाटणे यांनी आयुष्य रुग्णसेवेसाठी वाहण्याचा निर्धार केला. याच प्रेरणेतून त्यांनी खटाव तालुक्यातील सातेवाडी येथे सुमारे १२,५०० स्क्वेअर फुटांचे अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा संकल्प केला असून, या प्रकल्पाचा शुभारंभ लवकरच होणार आहे.
उच्चशिक्षित इंजिनिअर असलेल्या तिवाटणे यांनी विविध नगरपालिकांमध्ये सेवा बजावली. म्हसवडसारख्या पाणीटंचाईग्रस्त शहरासाठी त्यांनी १९९९ साली नळपाणी योजनेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. याच काळात त्यांच्या आईला कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि त्यांच्या आयुष्याला नवे वळण मिळाले.
आईची सेवा करताना कर्करुग्णांना भोगाव्या लागणाऱ्या वेदना त्यांनी जवळून अनुभवल्या. या अनुभवाने त्यांच्यातील संवेदनशीलता वाढली आणि त्यांनी परिसरातील कर्करुग्णांना मदतीचा हात देण्यास सुरुवात केली. औषधोपचार, मार्गदर्शन आणि समुपदेशनाद्वारे त्यांनी अनेकांना दिलासा दिला. त्यामुळेच लोकांनी त्यांना “आरोग्य मित्र” म्हणून ओळखायला सुरुवात केली.
गुजरातहून औषधे आणून अनेक रुग्णांना दिल्यामुळे अनेकांना नवसंजीवनी मिळाली. अनेकांनी त्यांना अक्षरशः देवदूत मानले. स्वतःच्या आईला वाचवता आले नाही, पण तिचे आयुष्य वाढवण्यात ते यशस्वी ठरले. याच दुःखातून त्यांनी ठरवले—आता कोणाचाही जीव कर्करोगामुळे जाऊ देणार नाही.
त्यांच्या या कार्यात पत्नी सविता तिवाटणे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
सातेवाडी येथे शेडे-पाटील यांनी एक एकर जागा विनामूल्य दिली. उद्योजक अरुण देसाई यांनी बांधकामासाठी लागणारे साहित्य देण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या या उपक्रमाला अनेक दानशूर व्यक्तींचा प्रतिसाद मिळत आहे.
आज या ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटलचे बांधकाम वेगाने सुरू असून, येथे तज्ज्ञ डॉक्टरांची टीम रुग्णसेवेसाठी उपलब्ध असणार आहे.
या रुग्णालयात कर्करुग्णांना मोफत उपचार दिले जाणार असून, ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हे केंद्र एक मोठे वरदान ठरणार आहे. त्यामुळे खटाव-माण परिसरातील रुग्णांना आता मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होणार आहे.
तिवाटणे यांनी आपल्या कार्यासाठी ‘सर्वज्ञ सामाजिक संस्था’ स्थापन केली असून, या संस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
सध्या या कॅन्सर हॉस्पिटलच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच हे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे. आरोग्य मित्र नितीन तिवाटणे यांची ही जिद्द आणि समाजासाठीची तळमळ निश्चितच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

