व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसवड.. प्रतिनिधी म्हसवड येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून या संदर्भात राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी सातारा यांची कार्यालयात भेट घेतली असता याबाबत तातडीची बैठक आयोजित करतो असे आश्वासन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी काँग्रेस पदाधिकारी शिष्टमंडळाला दिले. प्रदेश किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा.विश्वंभर बाबर , म्हसवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास गोजारी, युवक काँग्रेसचे दाऊद मुल्ला, सुहास भिवरे इत्यादी मान्यवरांनी जिल्हाधिकारी सातारा यांची म्हसवड येथील पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाई बाबत भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले. म्हसवड शहरात दहा ते बारा दिवसाच्या अंतराने पिण्याचे पाणी पुरविले जातअसून त्यामुळे जनतेत तीव्र नाराजी पसरली असल्याचे काँग्रेस शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना सांगितले .
याशिवाय सध्या पुरवली जाणारे पाणी अस्वच्छ असून त्यामुळे रोगराई वाढण्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. मूळ पाणीपुरवठा योजनेतील वरचेवर होणारे घोटाळे, नवीन मंजूर असणाऱ्या पाणीपुरवठा योजनेतील कामाचे चुकीचे नियोजन, अल्पावधीत झालेली पाणी पुरवठ्याची कामे दुय्यम दर्जाची व त्यामध्ये झालेला गैरव्यवहार याबाबत प्रा. बाबर व शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना तपशीलवार माहिती दिली.
म्हसवड येथील पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईमध्ये नागरिक हवालदिल, झाले आहेत. पाणीटंचाईमुळे महिला, छोटे मोठे व्यवसायिक यांच्यामध्ये तीव्र नाराजी असल्याचे शिस्तमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले . तातडीचा पर्याय काय असे जिल्हाधिकारी यांनी विचारले असता शहरासाठी टँकरच्या माध्यमातून पिण्याचे पाणी पुरवण्याची गरज असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत तातडीने उपाययोजना न झाल्यास सर्वपक्षीय आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.