नायगावमध्ये उभे राहणार क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक; १४२ कोटींचा प्रकल्प
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
मुंबई, दि. २३ :
स्त्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या आणि सामाजिक परिवर्तनाची मशाल चेतवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थान असलेल्या नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे त्यांचे भव्य स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या बैठकीचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
या स्मारकासाठी १४२ कोटी ६० लाख रुपयांची तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी ६७ लाख १७ हजार रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या स्मारकाची घोषणा केली होती, आणि आज त्यावर अंतिम निर्णय झाला.
हे स्मारक सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला आदरांजली असेल, तर महिला प्रशिक्षण केंद्र स्थानिक महिलांच्या सक्षमीकरणाचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल. या केंद्रात विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जाणार असून, त्याचे दीर्घकालीन व्यवस्थापन व अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी सातारा यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, यशदा, कौशल्य विकास विभाग व ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे प्रतिनिधी सहभागी असतील.