प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त म्हसवडमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

म्हसवड, ता. १८ सप्टेंबर: 

  प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती निमित्ताने म्हसवड शहरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराने एक नवा आदर्श घालून दिला आहे. मुस्लिम समाजाच्या वतीने अमीना मस्जिद येथे आयोजित या शिबिराचे आयोजन सातारा येथील बालाजी रक्तपेढीच्या सहकार्याने करण्यात आले. या शिबिरात सुमारे ७० जणांनी रक्तदान केले, ज्यामुळे समाजात उत्साह आणि सामाजिक योगदानाची भावना वृद्धिंगत झाली.

शिबिराचे उद्घाटन माण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मणराव कोडलकर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी डॉ. कोडलकर यांनी मुस्लिम समाजाच्या या आगळ्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. “२५ वर्षांच्या सेवाकाळात मशिदीत रक्तदान शिबिराचे आयोजन प्रथमच पाहायला मिळाले, आणि याचे उद्घाटन करण्याचा योग मला आला, हे मी माझे भाग्य मानतो,” असे त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. तसेच, रक्तदानाचे महत्व अधोरेखित करत, “प्रत्येक रक्ताचा थेंब जीवनदान देतो आणि दान करणे प्रत्येक धर्माचा मुलमंत्र आहे ,” असेही त्यांनी नमूद केले.

या शिबिराच्या आयोजनात बशीर मुल्ला, इर्षाद काझी, अस्लम मुल्ला (इंडियन आर्मी), हाफिज सिराज (इमाम), अजीज मुल्ला, हबीब काझी, खैरुद्दीन काझी, सलीम मुल्ला,अरमान मुजावर, सल्लाउद्दीन काझी, अकील काझी, निहाल काझी आणि गुलाब शेख यांसारख्या समाजातील मान्यवर व्यक्तींनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

ईद निमित्ताने, २७ लहान मुलांनी पवित्र कुराण शरीफमधील आयत आणि सुरे पठण केले. हाफिज सिराज यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या धार्मिक कार्यक्रमात मुलांना मदिना मशिद ट्रस्टतर्फे भेटवस्तू देण्यात आल्या, ज्यामुळे त्यांच्या आनंदात भर पडली.

या सामाजिक आणि धार्मिक उपक्रमामुळे म्हसवड शहरात सामाजिक एकता आणि मानवतावादी विचारांना चालना मिळाली आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!