गणेशमूर्ती निर्मितीत कारागीरांची धावपळ; सततच्या पावसामुळे सुकवण्याचे आव्हान
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
उंब्रज | प्रतिनिधी – कुलदीप मोहिते
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना उंब्रज व परिसरातील कुंभारवाड्यांमध्ये गणेशमूर्ती बनविण्याचे काम जोमात सुरू आहे. कुंभार बांधव आपले पारंपरिक कौशल्य वापरून विविध आकार, रंगसंगती व पोशाखात सुंदर मूर्ती घडविण्यात मग्न आहेत.
गावागावांतून मूर्तींच्या मागणीस सुरुवात झाल्याने कुंभारवाड्यात खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे. घरगुती गणपतीपासून ते सार्वजनिक मंडळांपर्यंत सर्वजण आपापल्या मूर्ती ठरवून ठेवू लागले आहेत. त्यामुळे कुंभारांमध्ये कामाचा व्याप वाढला असून, काही जण तर रात्रीच्या वेळेसही काम करताना दिसत आहेत.
बदलत्या काळानुसार मूर्ती बनविण्याच्या पद्धतीमध्येही बदल झाला आहे. पूर्वी शाडू मातीपासून मूर्ती बनवल्या जात होत्या, तर सध्या प्लास्टर ऑफ पॅरिसपासून आकर्षक आणि सुबक मूर्ती तयार केल्या जात आहेत. त्यामुळे गावातल्याच कारागीरांकडून मूर्ती खरेदी करण्याचा कल वाढला आहे.
मात्र यंदा सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मूर्ती सुकवण्यास मोठे अडथळे येत आहेत. वेळेत मूर्ती तयार करून ती सुरक्षित ठेवणे हे मूर्तिकारांसमोर मोठे आव्हान ठरत आहे.
परंपरा, व्यवसाय आणि भक्ती यांचा संगम असलेल्या या कालखंडात कारागीरांची लगबग पाहताना गणेशोत्सवाचे वातावरण अगोदरच साकार होत असल्याची प्रचीती येते.