दहिवडी पोलिसांची मोठी कामगिरी! चोरीप्रकरणी ९ जण अटकेत, १३ लाखांचा मुद्देमाल जप्त
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
दहिवडी | प्रतिनिधी
माण तालुक्यातील दहिवडी व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मालमत्ता चोरीच्या घटनांचा दहिवडी पोलिसांनी यशस्वी छडा लावला आहे. या प्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली असून सुमारे १३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबतची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
अटक आरोपींची नावे पुढीलप्रमाणे:
प्रविण बापुराव चव्हाण, प्रशांत बापुराव चव्हाण, विकास तानाजी चव्हाण, सुमीत रामचंद्र पाटोळे, अनिल नंदकुमार दळवी, मुकेश आबा अवघडे, सौरभ संतोष अवघडे, गोरख संजय चव्हाण, अजय आनंदा चव्हाण आणि एक विधीसंघर्ष बालक – सर्वजण रा. दहिवडी, ता. माण, जि. सातारा.
दहिवडी पोलिस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विहिरीवरील व बोरवेलवरील मोटार आणि केबल चोरी, शासकीय धान्य गोडावून व जिल्हा परिषद शाळांमधून तांदूळ व गॅस सिलेंडर चोरी, तसेच सिध्दनाथ मंदिराजवळील व्यायाम शाळेतील साहित्य चोरीच्या घटना घडत होत्या. या सर्व घटना अज्ञात आरोपींनी केल्या होत्या.
दराडे यांनी त्यांच्या स्टाफसह सक्रिय तपास सुरू ठेवला असता, त्यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित आरोपींचा शोध घेऊन ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून एकूण ९ गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली वाहने व चोरीस गेलेला मुद्देमाल असा एकूण १२,८४,००८ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, पो.उ.नि. गुलाब दोलताडे, स.पो.उ.नि. प्रकाश खाडे, पो.ह. बापु खांडेकर, तानाजी काळेल, विजय खाडे, रामचंद्र गाढवे, नितीन धुमाळ, पो.कॉ. अजिनाथ नरबट, निलेश कुदळे, महेंद्र खाडे, गणेश खाडे यांचा मोलाचा सहभाग होता.
या टोळीने अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांना त्रस्त केले होते. चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, दहिवडी पोलिसांनी या अट्टल चोरट्या टोळीचा पर्दाफाश करत ९ जणांना अटक केली असून या यशस्वी कारवाईमुळे दहिवडी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.