चोरीची मोटार सायकल व संरक्षित कासवासह एक आरोपी अटकेत – स्थानिक गुन्हे शाखेची व उंब्रज पोलिसांची संयुक्त कारवाई

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
उंब्रज :प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा व उंब्रज पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईतून एक मोठा गुन्हा उघडकीस आला आहे. चोरीच्या मोटार सायकलसह एक दुर्मिळ व संरक्षित कासव (Indian Black Turtle) हस्तगत करण्यात आले असून एक इसम अटकेत घेतला आहे. ही धडक कारवाई दिनांक 17 जुलै रोजी उंब्रज परिसरात करण्यात आली.

गुप्त बातमीदारामार्फत प्राप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे यांच्या पथकास तसेच उंब्रज पोलीस ठाण्याचे सपोनि रविंद्र भोरे यांना संयुक्त कारवाईचे आदेश देण्यात आले होते.

चाफळ फाटा – माजगाव फाटा रोडवरील मैत्री पार्क हॉटेलजवळ सापळा रचण्यात आला. यावेळी एका संशयित इसमाला मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने सदर मोटारसायकल सातारा एमआयडीसी येथून चोरल्याचे कबूल केले. विशेष म्हणजे या मोटारसायकलच्या हँडलला असलेल्या पिशवीत हालचाल दिसून आली. तपासणी केली असता त्यात Indian Black Turtle (भारतीय काळं कासव) हे वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत संरक्षित व शेड्युल्ड-I मध्ये समाविष्ट असलेले प्राणी आढळले.

पोलिसांनी तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांची मदत घेऊन कासव जप्त केले असून आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा तसेच चोरीच्या गुन्ह्यांतर्गत उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, सदर आरोपीकडील चोरीची मोटार सायकल ही सातारा शहर पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदर कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण देवकर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. रोहित फार्णे, पो.उ.नि. विश्वास शिंगाडे तसेच पोलीस कर्मचारी व वन विभागाचे अधिकारी – सुहास भोसले, रमेश जाधवर, संतोष जाधवर यांनी मोलाची भूमिका बजावली.

या उल्लेखनीय व संवेदनशील कारवाईबाबत पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, आणि पोलीस उप अधीक्षक श्री. अतुल सबनीस (गृह), सातारा यांनी सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!