मनसे विद्यार्थी सेनेचा इशारा : कराड परिसरातील अनधिकृत शाळांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
कुलदीप मोहिते
कराड : प्रतिनिधी
कराड पंचायत समिती क्षेत्रामध्ये कोणतीही शासकीय मान्यता किंवा परवानगी नसतानाही अनेक शाळा सुरू असून, या शाळांमध्ये केजी ते बारावी पर्यंतचे वर्ग भरवले जात आहेत. मात्र, या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा देखील उपलब्ध नाहीत. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष विनायक भोसले यांनी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
या शाळांमध्ये इमारती शैक्षणिक वापरासाठी अधिकृत नाहीत. टाउन प्लॅनिंगची मंजुरी नाही, खेळाचे मैदान नाही, प्रयोगशाळा व वाचनालयाची सोय नाही, आणि शिक्षकही आवश्यक पात्रतेचे नाहीत, असे आरोप श्री. भोसले यांनी केले आहेत. या शाळांमधून इंग्रजी माध्यमात शिक्षण दिले जाते मात्र, प्रत्यक्षात सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची फसवणूक होत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले.
“शासनाच्या कोणत्याही परवानगीशिवाय या शाळा चालू कशा असू शकतात? आणि त्या कोणाच्या आशीर्वादाने सुरु आहेत?” असा सवाल मनसे विद्यार्थी सेनेने केला आहे. या शाळांवर तत्काळ कारवाई व्हावी, अन्यथा पुढील सहा दिवसांत कारवाई न झाल्यास मनसे विद्यार्थी सेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष विनायक भोसले यांनी दिला आहे.
या निवेदनाची दखल घेत जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी सहा दिवसात कारवाईचे आश्वासन दिले आहे. आता प्रशासन या प्रकरणात किती तत्परतेने पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.