पळशी दारूबंदी ठरावाच्या पार्श्वभूमीवर म्हसवड पोलिसांची धडक कारवाई; 1.53 लाखांचा मुद्देमाल जप्त
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड प्रतिनिधी |
पळशी येथील ग्रामसभेत घेतलेल्या दारूबंदीच्या ठरावाच्या अनुषंगाने म्हसवड पोलीस ठाण्यांतर्फे अवैध दारू विक्री आणि वाहतुकीवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण 1 लाख 53 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पळशी ते मार्डी रस्त्यावर पेट्रोलिंग दरम्यान एका संशयित मोटारसायकलस्वाराचा पाठलाग करून त्यास अटक केली. त्याच्या गाडीत असलेल्या पिशवीतून देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव धनाजी मुरलीधर गुजले (वय 35, रा. पळशी, ता. माण, जि. सातारा) असे असून, तो गावात अवैध दारू विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65(अ) व 65(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय, भालवडी येथे सनी नंदकुमार बनसोडे हा बेकायदा कल्याण मटका चालवताना आढळून आला. त्याच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, देवानंद खाडे, अमर नारनवर, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, विकास बोडरे, आणि विकास ओंबासे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
दारूबंदी ठरावाची अंमलबजावणी प्रभावीपणे होत असून अशा कारवाया भविष्यातही सुरू राहणार असल्याचा इशारा म्हसवड पोलिसांनी दिला आहे.