म्हसवड प्रतिनिधी विरळी (ता. माण) येथील संकेत सत्यवान गोरड (वय 17) हा शिक्षणासाठी आटपाडी येथे राहत असताना गत चार दिवसांपासून बेपत्ता आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
संकेत हा विद्यानगरमधील पांडुरंग जरे यांच्या भाड्याच्या घरात राहत होता. तो शिक्षणानिमित्त इथे स्थलांतरित झाला होता. मात्र, गत चार दिवसांपासून तो बेपत्ता असून, त्याचा काहीही शोध लागत नसल्यामुळे त्याच्या कुटुंबाने आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
संकेतचे आई-वडील अत्यंत गरीब असून, विरळीत मेंढपाळाचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. शिक्षणासाठी त्यांनी मोठ्या कष्टाने मुलाला आटपाडी येथे पाठवले होते. परंतु, त्याच्या अचानक बेपत्ता होण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
संकेतच्या शोधासाठी पोलीस सक्रिय झाले असून, परिसरात चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे विरळी व आटपाडी परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या महिन्यात दिवड (ता. माण) येथील संस्कार लोखंडे नावाचा 10वीचा विद्यार्थी अज्ञात व्यक्तींकडून मोटर सायकलवर पळवून नेण्याचा प्रकार घडला होता. अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत तातडीने उपाययोजना केल्या जाव्यात, अशी मागणी पालकांकडून होत आहे. तसेच, संकेतचा लवकरात लवकर शोध लागावा, यासाठी प्रशासनाने अधिक प्रयत्न करावेत, अशी विनंती कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी केली आहे.