बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) प्रशासनाकडून अदानी कंपनीचे नवीन स्मार्ट मीटर लावण्याच्या निर्णयामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. स्मार्ट मीटरद्वारे वाढलेल्या लाईटबिलांमुळे संतप्त झालेल्या वीज ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
पश्चिम महाराष्ट्र समन्वयक आणि माजी आमदार दगडू दादा सकपाळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची भेट घेतली. या भेटीत शिष्टमंडळाने स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय त्वरित थांबवण्याची मागणी केली. यापूर्वी लावण्यात आलेले स्मार्ट मीटर काढून जुन्या पद्धतीचे मीटर बसवावेत, अशीही विनंती करण्यात आली.
प्रशासनाने शिष्टमंडळाच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. या चर्चेत शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, सुहास सामंत, अरविंद नेरकर, आमदार महेश सावंत, बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर, अनिल कोकीळ, रंजन चौधरी, विभाग प्रमुख संतोष शिंदे, शंकर सकपाळ तसेच बेस्टचे सहाय्यक महाव्यवस्थापक (वि. पु.) बिलाल शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
बेस्टच्या स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहकांवर आर्थिक भार पडत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रशासनाने समस्येवर तोडगा काढण्यासाठी तत्परता दाखवली आहे. यामुळे प्रभावित ग्राहकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.