व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड, माणदेशी महिला सहकारी बँकेला आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार करून संपूर्ण महाराष्ट्रभर सेवा देण्याची ऐतिहासिक संधी मिळाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि महाराष्ट्र राज्य सहकार विभागाने बँकेला राज्यभर कार्य करण्यासाठी अधिकृत परवानगी दिली आहे.
1997 साली स्थापन झालेली माणदेशी महिला सहकारी बँक ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी वचनबद्ध आहे. सध्या बँकेच्या सातारा, सांगली, सोलापूर, रायगड, कोल्हापूर, आणि पुणे या जिल्ह्यांत 8 शाखा कार्यरत आहेत. आता राज्यभर विस्ताराच्या परवानगीमुळे बँकेला अधिक महिला ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे.
ग्रामीण महिलांसाठी नवी संधी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखाताई कुलकर्णी म्हणाल्या, “ही परवानगी म्हणजे आमच्यासाठी ऐतिहासिक टप्पा आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आम्ही विविध आर्थिक योजना, कर्ज सुविधा, आणि डिजिटल बँकिंग सेवांचा विस्तार करू. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना अधिक मजबूत अर्थसहाय्य उपलब्ध होईल.”
माणदेशी बँकेच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि राज्य सहकार विभागाचे आभार मानले. त्या म्हणाल्या, “माणदेशी बँक ही केवळ बँक नसून ग्रामीण महिलांसाठी आर्थिक स्वातंत्र्याचे साधन आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर सेवा देण्याची परवानगी मिळणे म्हणजे महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याची मोठी संधी आहे.”
महिलांच्या उद्योजकतेला बळ माणदेशी बँक गेल्या काही वर्षांत ग्रामीण महिलांसाठी वित्तीय साक्षरता, बचत, आणि लघुउद्योजकतेला चालना देत आहे. या विस्तारामुळे अधिकाधिक महिलांना बँकेच्या सेवांचा लाभ होईल, तसेच त्यांच्या उद्योजकीय प्रयत्नांना आर्थिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्रभर माणदेशी बँकेचे जाळे पसरल्याने राज्यातील ग्रामीण भागातील महिलांसाठी बँकिंग सेवा अधिक सुलभ होतील आणि महिला सक्षमीकरणाला नवे परिमाण मिळेल.