लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी देवीच्या रथोत्सवासाठी प्रशासनाने चोख नियोजन केले असून, यात्रेत कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन सुसज्ज करण्यात आले आहे. येत्या २ डिसेंबर रोजी संपन्न होणाऱ्या या भव्य यात्रेसाठी विविध यंत्रणांना निर्देश देण्यात आले असून, जिल्हाधिकारी डुडी यांनी यात्रेला आदर्श स्वरूप देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
प्रशासन सज्ज, भाविकांची गैरसोय होणार नाही
म्हसवड शहरात भरणाऱ्या सिध्दनाथ यात्रेच्या नियोजनाबाबत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, गतवर्षीप्रमाणे यंदाही भाविक व व्यावसायिक यांची कोणतीही गैरसोय होणार नाही. यंदाची यात्रा आदर्श ठरण्यासाठी प्रशासन पूर्ण तयारीत आहे. भाविकांसाठी आरोग्य, वाहतूक, स्वच्छता आणि सुरक्षा यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात असून, प्रत्येक विभागाला योग्य जबाबदाऱ्या दिल्या आहेत.
आरोग्य व्यवस्थेवर विशेष भर
जिल्हाधिकारी डुडी यांनी आरोग्य विभागाला यात्रेदरम्यान प्रभावी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक किलोमीटरवर रुग्णवाहिका तैनात ठेवण्याबरोबरच पालिकेच्या इमारतीजवळ तात्पुरते रुग्णालय उभारण्याचे निर्देश दिले आहेत. या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर, औषधांचा साठा आणि अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतील. याशिवाय म्हसवड आरोग्य केंद्र आणि खासगी रुग्णालयांमध्ये बेड आरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
श्रींच्या रथासाठी नवा मार्ग
माणगंगा नदीपात्रात पाणी असल्याने यंदा श्रींचा रथ बायपास रोडमार्गे नेण्यात येणार आहे. रथ मार्गातील अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. म. फुले चौक ते पंढरपूर महामार्ग उतारामुळे संभाव्य अडथळ्यांवर भराव टाकण्याची मागणीही माजी नगरसेवक युवराज सूर्यवंशी यांनी केली आहे.
पार्किंगची सोय सिद्धनाथ हायस्कूल शेजारी अतिक्रमण हटवलेल्या मैदानात वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी . मोठ्या मैदानामुळे भाविकांना पार्किंग सोयीचे होईल, अशी मागणी माजी नगरसेवक अकील काझी यांनी मांडली, ज्यावर सकारात्मक चर्चा झाली.
जिल्हाधिकारी डुडी यांनी बैठकी दरम्यान प्रत्येक विभागाचा आढावा घेतला आणि यात्रेदरम्यान कर्तव्यात कसूर झाल्यास कारवाईची तंबी दिली. त्यांनी यात्रेच्या मुख्य दिवशी स्वत: यात्रेकरूंशी संवाद साधून व्यवस्थेचा आढावा घेण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीला प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, तहसीलदार विकास अहिरे, मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, सपोनि सखाराम बिराजदार, रथ मानकरी बाळासाहेब राजेमाने, जयसिंह राजेमाने, तेजसिंह राजेमाने, अँड. पृथ्वीराज राजेमाने, सयाजीराजे राजेमाने, गणपतराव राजेमाने,माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, माजी नगरसेवक युवराज सूर्यवंशी , मा.नगरसेवक अकील काझी इंजि. सुनील पोरे,अप्पासाहेब पुकळे , कैलास भोरे,इंजि. सुनील पोरे,सिध्दनाथ देवस्थान ट्रस्ट चे पदाधिकारी, डूबल मानकरी व म्हसवडकर नागरीक आदी प्रमुख उपस्थित होते,
म्हसवडच्या सिध्दनाथ यात्रेपासून जिल्ह्यातील यात्रांचा हंगाम सुरू होतो, त्यामुळे म्हसवड यात्रा ही आदर्श ठरणे महत्त्वाचे आहे. भाविक आणि व्यावसायिकांच्या सोयीसाठी प्रशासनाने घेतलेले ठोस निर्णय यात्रेला यशस्वी बनवतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. —
श्रींचा रथोत्सव आणि लाखो भाविकांचा सहभाग, प्रशासन सज्जतेसाठी पूर्ण कटिबद्ध असल्याचा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला.