महायुतीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाला गती – आमदार आदिती तटकरे

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसळा- सुशील यादव

 महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने २८८ पैकी २३५ जागांवर विजय मिळवून ऐतिहासिक यश संपादन केले आहे. श्रीवर्धन मतदारसंघातून माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आदिती तटकरे यांनी दुसऱ्यांदा आमदार म्हणून दिमाखदार विजय मिळवला आहे. मतदारसंघातील जनतेने दिलेल्या ८२,००० हून अधिक मताधिक्याने मिळालेला विजय हा श्रीवर्धन मतदारसंघाचा सन्मान असल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे.

म्हसळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात आयोजित स्वागत कार्यक्रमात आमदार तटकरे यांनी समर्थक आणि कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. या वेळी बोलताना त्या म्हणाल्या, “महायुतीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत राहू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवल्या जातील.”

आमदार तटकरे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महिलांसाठी विशेष योजना यशस्वीरीत्या कार्यान्वित केल्याचा उल्लेख केला. त्या पुढे म्हणाल्या, “महिलांसाठीच्या योजनांमुळेच महायुतीला जनतेचा अधिकाधिक पाठिंबा मिळाला आहे. मला मंत्री मंडळात महिला मंत्री म्हणून जी संधी मिळाली, त्यासाठी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांचे आभार मानते.”

स्वागत कार्यक्रमात तटकरे यांनी कार्यकर्त्यांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला.कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष समीर बनकर,जिल्हा चिटणीस महादेव पाटील,नगराध्यक्ष संजय कर्णिक,माजी नगराध्यक्ष असहल कादिरी, अक्रमभाई,महीला अध्यक्षा मिना टिंगरे,सोनल घोले, माजी सभापती छाया म्हात्रे,मधुकर गायकर,संदीप चाचले,तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले,भाजप प्रमुख तुकाराम पाटील,शहराध्यक्षा शगुप्ता जहांगीर,गौरी करडे,अनिल बसवत,महेश घोले,शरद चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार तटकरे यांनी महायुतीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. “राज्याच्या प्रगतीसाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. श्रीवर्धन मतदारसंघाची जबाबदारी पार पाडताना महाराष्ट्राच्या विकासासाठी योगदान देईन,” असे त्या म्हणाल्या.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!