“उमेदवाराचा चहा सुद्धा न पिण्याचा ठराव ..”* *राजकारणातील बाजारुपणाचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने मांडला ऐतिहासिक ठराव.
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
दहिवडी:
आगामी २०२४ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माण-खटाव विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने इम्तियाज नदाफ यांना उमेदवारी दिल्यानंतर दहिवडीत उत्साहात कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पैशाच्या अनैतिक वापराविरोधात एक ठोस पाऊल उचलण्याचा ठराव घेण्यात आला. “धनदांडग्यांच्या प्रभावाखालील राजकारणाला विराम द्यावा,” असा निर्धार व्यक्त करत कार्यकर्त्यांनी ठरवले की उमेदवाराचा चहा सुद्धा न पिण्याचा ठराव पारित करून माण-खटावच्या संस्कृतीला पुनर्जिवित करायचे आहे.
वंचित बहुजन आघाडीने ठरवले की निवडणुकीसाठी निधी गोळा करण्यासाठी जनतेला मदतीचे आवाहन करत, बँक खात्याचा क्यूआर कोड व्हायरल करण्यात येईल. “जनतेच्या पैशातून जनतेसाठी निवडणूक लढवणार,” असा संकल्प वंचित बहुजन आघाडीने केला आहे. हा उपक्रम माण-खटावमधील राजकीय नैतिकतेचा पुन्हा आधार बनवण्याचा प्रयत्न आहे.वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून नैतिकतेचा विचार पुन्हा चर्चेत येत असल्याचे पाहून माण खटाव मधील स्वाभिमानी सुसंस्कृत मतदारांमध्ये नक्कीच आशेचा किरण उदयास येईल आणि धन दांडग्यांच्या मुजोरी राजकारणाचा बिमोड होईल. अशी अपेक्षा या बैठकी दरम्यान करण्यात आली.
सदर बैठकीस मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार इम्तियाज भाई नदाफ यांच्यासोबतच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भीमराव घोरपडे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाषराव गायकवाड, माणचे माजी सभापती बाळासाहेब रणपिसे, माणचे तालुकाध्यक्ष युवराज भोसले, ज्येष्ठ नेत्या कमलताई म्हस्के, माजी सरपंच, बजरंग वाघमारे युवाचे सनी तुपे आणि रणजीत सरतापे, मसवडचे माजी नगरसेवक अंगुली बनसोडे वडूजचे विद्यमान नगरसेवक तुषार बैले, आंधळी चे ग्रामपंचायत सदस्य अतुल खरात, नजीर आतार, अजीम मुल्ला, जावेद तांबोळी, महेंद्र कांबळे, गौरव भंडारी, निकित खरात, कुलदीप बनसोडे, इत्यादी उपस्थित होते..