खटाव-माणमधील राजकीय परिस्थितीत नवा वळण, निवडणुकीतून माघार घेण्याचा धक्कादायक निर्णय जाहीर केल्यानंतर निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी लोधवड्याला धाव घेत ‘देशमुख साहेब फॉर्म भरा’ची जोरदार मागणी केली. प्रभाकर देशमुख यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार निवडीवरून निर्माण झालेल्या राजकीय घडामोडींमुळे हे पाऊल उचलले असले तरी त्यांच्या समर्थकांनी त्यांना माघार घेऊ नये, अशी मागणी केली आहे.
देशमुख यांनी सोशल मीडियावर निवडणूक न लढवण्याची घोषणा केल्यानंतर माण-खटावमधील समर्थकांमध्ये संतापाची लाट पसरली. निष्ठावंत कार्यकर्त्यांनी लोधवड्याला भेट देऊन ‘माण-खटावचा एकच नारा, देशमुख साहेब फॉर्म भरा’ अशी घोषणाबाजी केली. यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, “मी जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन माणसं जोडली आहेत. शिवरायांचा आदर्श घेत मी समाजहितासाठी काम करणार असून माण-खटावच्या जनतेच्या प्रत्येक अश्रूला पुसण्याचे काम करीन.”
देशमुख पुढे म्हणाले, “मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबत असेन. माण-खटाव मतदारसंघाला एक नवीन उंचीवर नेण्यासाठी माझं संपूर्ण नियोजन आहे. मात्र, या राजकीय खेळीमुळे काहींच्या कार्यसंस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. मी माघार घेणार नाही, आणि तुमच्या पाठिंब्यामुळेच अन्यायाविरुद्ध लढण्याची माझी ताकद वाढली आहे.”
समर्थकांनी या वेळी शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत प्रभाकर देशमुख यांनी माघार घेऊ नये, अशी जोरदार मागणी केली. त्यांनी सांगितले की, देशमुख यांनी जर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारी दिली नाही, तर मनोज जरांगे-पाटील, रासप किंवा अन्य पक्षातून उमेदवारी घेऊन लढावे, परंतु माघार घेऊ नये.
कार्यकर्त्यांनी यावेळी आपल्या संतापाला वाट मोकळी करून अनेक स्थानिक नेत्यांवर नाराजी व्यक्त केली. “फॉर्म कधी भरायचा ते सांगा, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही,” असे कार्यकर्त्यांनी ठामपणे सांगितले.
या मेळाव्यात संजय जाधव, पृथ्वीराज गोडसे, दिलीप तुपे, जयवंत खराडे, विक्रम शिंगाडे, बाळासाहेब सावंत, तेजसिंह राजेमाने, किशोर सोनवणे, तानाजी कट्टे, विष्णूपंत अवघडे, नितीन राजगे, दादासाहेब वाघमोडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मनोगते व्यक्त केली.
देशमुखांच्या माघारीच्या निर्णयामुळे माण-खटावमधील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, त्यांच्या समर्थकांनी हा निर्णय मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव वाढवला आहे.