व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) कुलदीप मोहिते कराड
कराड : प्रतिनिधी “यशवंतराव आणि वेणूताई यांचा संसार एकमेकांचा विश्वास, नाते सांभाळण्याची समज अशा प्रत्येक गोष्टीत तो परिपूर्ण होता. यशवंतरावांच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा उचलणारी सौजन्यशील मूर्ती, उद्यानातून अग्नि कुंडात पाऊल टाकलेली स्त्री, महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक, भारतीय स्त्रीत्वाचा अविष्कार असणाऱ्या संस्कारशील, त्यागी व्यक्तिमत्व म्हणजे वेणूताई चव्हाण या होय.
आधुनिक महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री राहिलेले यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी वेणूताई या यशवंतरावांच्या सावली होत्या. फलटणच्या मोरे कुटुंबात जन्मलेल्या वेणूताई बालपणी सुखा- समाधानाचे, आनंदाचे जीवन जगलेल्या. वडिलांनी त्यांच्यावर चांगले संस्कार कसे होतील याची परिपूर्ण काळजी घेतलेली होती. विवाह नंतर यशवंतरावांची सावली म्हणून वेणूताईंनी समर्पण भावनेने जीवन व्यतीत केले. त्यांनी कार्यक्षम व प्रेमळ गृहणीची भूमिका समर्थपणे पार पाडली.
लग्नानंतरच्या पहिल्या संक्रातीच्या वेळी तुरुंगवास घडला तरी त्या निर्भयीपणे सामोरी गेल्या. संसाराची सर्व जबाबदारी कर्तव्य पुरतीच्या भावनेने पार पाडत त्यांनी पतीच्या कार्यास निष्ठेने साथ दिली. यशवंतराव आणि वेणूताई यांच्यामध्ये उत्कट प्रेम होते. वेणूताई म्हणजे यशवंतरावांचे आयुष्य प्रकाशमान करणारी समईतील ज्योतच. कौटुंबिक आणि राजकीय जीवनात कधीही मनोधर्य न खचलेली स्त्री. निर्वाज्य प्रेम, आणि निरासक्त, साथसंगत करणारी पत्नी म्हणजे वेणूताई चव्हाण या होय.”असे प्रतिपादन वेणूताई चव्हाण कॉलेजचे माजी प्राचार्य बी. एन. कालेकर यांनी केले. ते श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराडच्या उच्च शिक्षण मंडळ, कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड व यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सौ. वेणूताई चव्हाण यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून “स्व. यशवंतराव चव्हाण व सौ. वेणूताई चव्हाण : सहजीवनाचा आदर्श” या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे जनरल सेक्रेटरी अल्ताफहुसेन मुल्ला हे होते. बी. एन. कालेकर पुढे म्हणाले की,“ यशवंतराव आणि वेणूताई यांचे सहजीवन अतिशय उत्कट पातळीवरचे होते. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना ते वेणूताईंशी हितगुज करीत असत. राजकीय व्यक्तींनी अखंडपणे सावध राहावे असे ते मानत असत. सद्य: स्थितीत ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. त्यांच्या अंगी सुसंस्कृतपणा आणि राजकीय चातुर्य होते.” अध्यक्षस्थानावरून संस्थेचे जनरल सेक्रेटरी अल्ताफहुसेन मुल्ला म्हणाले कि, ” आजच्या वर्तमानात यशवंतराव चव्हाण आणि सौ. वेणूताई चव्हाण यांच्या जीवनातील नैतिकता, सभ्यता, जीवनमूल्ये अंगीकारली पाहिजेत. त्यांनी निर्माण केलेला आदर्श सहजीवनाचा वारसा जपणे हे आपले कर्तव्य आहे .” या समारंभास प्रमुख उपस्थिती म्हणून अरुण पाटील (काका) (विश्वस्त व सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था कराडचे उच्च शिक्षण मंडळ कराड), . जयंत पाटील (काका) (अध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट, कराड) हे उपस्थित होते. तसेच या समारंभास संस्था पदाधिकारी म्हणून . भास्करराव कुलकर्णी, . नंदकुमार बटाणे, यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्सचे प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. एस. आर. सरोदे यांनी केले. प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांचा परिचय प्रा. एस. एस. बोंगाळे यांनी करून दिला तर प्रा. सौ. एस. पी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार प्रा. डॉ. के. एस. जगधने यांनी मानले. या कार्यक्रमास दोन्ही महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापिका, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.