रेठरे खुर्द येथील जवान अनिल दिनकर कळसे यांना वीरमरण
व्हिजन२४ तास न्युज म्हसवड (संपादक: अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते (प्रतिनिधी )
कराड;
जवान अनिल कळसे यांना मणिपूर येथे सेवेत असताना अपघातात वीरमरण आले आहे
याबाबतची अधिक माहिती अशी की, रेठरे खुर्दचे ता कराड जि सातारा सुपुत्र हवालदार अनिल कळसे हे मणिपूर येथे भारतीय सैन्यदलात हवालदार म्हणून देशसेवा बजावत होते. त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी मुले असा त्यांचा परिवार आहे भारतीय सेनेतील बॉम्बे इंजिनिअर ग्रुपमधील २६७ इंजिनिअर रेजिमेंटमध्ये सध्या ते कार्यरत होते. २९ सप्टेंबर २००० मध्ये ते भारतीय सैन्य दलात भरती झाले. २०१७ मध्ये ते सैन्यातून निवृत्त झाले होते; परंतु त्यांनी सेवा वाढवून घेतली होती. पुढील वर्षी ऑगस्टमध्ये सेवेतून निवृत्त होणार होते.
पुढील महिन्यात ते सुटीवर येणार असल्याचे त्यांनी कुटुंबीयांना कळवले होते; परंतु आज सकाळी त्यांना वीरमरण आल्याची माहिती गावातील ग्रामस्थांना मिळाली. काल दुपारी मणिपूर येथील सैनिक तळावर जेसीबीच्या साहाय्याने काम सुरू होते. जवान अनिल कळसे हे त्याठिकाणी असताना त्यांच्या अंगावर झाड कोसळले व त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यात त्यांना वीरमरण आले. काल गुरुवारी सायंकाळपर्यंत त्यांच्यावर शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू होती. ती रात्री उशिरा पूर्ण झाली. शनिवारी सकाळी त्यांचे पार्थिव गावी येणार आहे. येथे जाई मोहिते प्रशालेजवळ अंत्यविधी होणार आहे.