अजित काटकर यांचा खोडाला बाजा हा कथासंग्रह म्हणजे अस्सल ग्रामीण विनोदी कथांची मेजवाणी:रविकुमार मगदुम
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
मध्यमवर्गीय, उच्चवर्गीय मराठी माणसांच्या जीवनातील विसंगती, गंमतीजमती, रूढी, प्रथा-परंपरा यावर आधारित विनोदी साहित्याची मेजवानी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, चि. वि. जोशी यांच्यापासून पु.ल. देशपांडे पर्यंत अनेक साहित्यिकांनी वाचकांना दिली. नंतरच्या काळात द. मा. मिरासदार, शंकर पाटील, वसंत सबनीस, रा. रं. बोराडे आदी लेखकांनी मराठी साहित्यातील ही विनोदाची पालखी महारष्ट्राच्या ग्रामीण भागातून मिरवली.
ग्रामीण जीवनातील घडामोडी, स्वातंत्र्योत्तर काळात ग्रामीण भागात झालेला बरा-वाईट बदल, निवडणुकांचे राजकारण, शिक्षणव्यवस्था सहकारी संस्था, शिक्षण संस्था, साखर कारखाने यातील सत्तास्पर्धा यातील विसंगती हेरुन या सारस्वतांनी मराठी साहित्यात ग्रामीण विनोदी कथा रुजवली.
शहरी कथेला याच काळात दुर्बोधतेचे वळण लागले होते. या दुर्बोधतेतुन वाचकांची सुटका विनोदी साहित्याने केली. येथे दुर्बोध समजल्या जाणाऱ्या कथांचे मूल्यमापन करायचे नाही. पण वाचकांची सहज प्रवृत्ती दुर्बोधतेऐवजी सुबोधतेकडे असते. तेवढ्यापुरतीच ही तुलना केली आहे.
याच काळात शिक्षणाचा प्रसार तळागाळापर्यंत वाडी-वस्त्यांवर पोहोचवला गेला. ग्रामीण भागातले आदिवासी वाड्यावरले नवशिक्षिततरुण साहित्य प्रांतात विहार करू लागले. त्यातील काहीजण विनोदी लेखन करून लागले, या लेखकांना ग्रामीण जीवनाची प्रत्यक्षानुभूती आहे.
सातारा जिल्ह्यातील वरकुटे-म्हसवड गावचे सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज म्हसवड येथे गणित विज्ञान विषयाचे अध्यापन करणारे व्यासंगी शिक्षक अजित काटकर हे असेच ग्रामीण भागातील लेखक स्वतः पत्रकार असल्याने सतत बातमीच्या शिकारीवर लेखणीची बंदूक घेऊन सज्ज असणारे, पत्रकाराच्या नजरेतून बातमीतली विनोदी ‘बात’ कशी सुटेल? अशा बातेचा उपयोग ते विनोदी कथालेखनासाठी करणारच.
‘खोडाला बाजा’ या प्रस्तूत विनोदी कथासंग्रहात लेखक अजित काटकर यांनी यापूर्वी महाराष्ट्रातील अनेक विनोद दिवाळी अंकांतून प्रसिद्ध केलेल्या कथांचा संच वाचकांच्या भेटीला आणला आहे. या कथांमधून ग्रामीण परिसरातील विविध क्षेत्रांतील घडामोडीचे विनोदी शैलीत शब्दचित्रे रंगवली आहेत.
वस्त्रहरण कथेचे उदाहरण घ्या. गावच्या जत्रेत नाटक करायचे ठरते. वस्त्रहरण नाटकाची निवड होते. स्थानिक कलाकारांना घेऊन स्थानिक दिग्दर्शकच नाटक सादर करणार असतो. अपवाद फक्त द्रौपदीचे काम करणाऱ्या स्त्री कलावंताचा. या भूमिकेसाठी शहरातून तरुण नटी आणणे, तिचे आगमन, नाटक बसवताना येणाऱ्या अडचणी आणि अखेरीस भर दरबारात दुःशासनाकडून द्रौपदीच्या अंगावरील साड्यांचे हरण होण्याऐवजी साड्यांच्या मालकिणींकडूनच कसे व का होते याचे विनोदी शैलीत वर्णन करताना काटकरांनी प्रासंगिक विनोदाचा नमुना पेश केला आहे.
खोडाला बाजा या कथेत आडगावच्या परसुनानाच्या मुलाच्या लग्नात गावच्याच वाजंत्र्यांनी वाजवायची सुपारी घेतली नाही, याचाराग मनात धरून परसुनाना खैराच्या झाडाचे खोड रस्त्यातच आडवे घालून शेजारील गावातील लग्नात वाजवून गावी परतणाऱ्या किसनतात्याच्या वाजंत्री पथकाची कशी खोड मोडतात हे कळते. ही कथा वाचल्यावर रा. रं. बोराडे यांच्या कथेतील भजनी मंडळाला गावाबाहेरच अंगावर धावून येणाऱ्या कुत्र्यांसमोर रात्रभर सवाद्य भजन कसे करावे लागते या कथेची आठवण येते..
‘पहिली दिवाळी’ कथेतील नायक सदा लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळसणाला सासूरवाडीच्या आमंत्रणाची वाट पहात असतो, माहेरी गेलेल्या बायकोचे पत्र येईल या आशेने पोस्टमनच्या घरावरून चकरा मारतो. त्याच्या सासूरवाडीला जाण्याची चर्चा गावभर सुरू असते, म्हणून हा बिनबुलाया मेहमान सासूरवाडीला जाण्यास निघतो. वाटेत त्याची कशी फजिती होते याचे खुमासदार वर्णन लेखकाने केले आहे. या कथेचा शेवट मात्र कारुण्याची झालर लावून करण्यात आला आहे. त्यातील विनोद मला भावला. अशा प्रकारचा विनोद साहित्य क्षेत्रात वरच्या दर्जाचा मानला जातो. जावयाला निमंत्रण न पाठवण्याचे कारण शेवटी कळते.
‘मनुचा अणुकरार’ ही अलीकडच्या काळातील राजकीय घडोमोडीवरील व्यंगकथा आहे. प्रा. विसरभोळे चक्क प्रेमात पडले ही कथा. साधेभोळे प्राध्यापक इमानेइतबारे नोकरी करीत असतात. त्याच कॉलेजमध्ये येणाऱ्या तरुण प्राध्यापिकेमुळे त्यांचे जीवन कसे बदलते याचे चित्रण करणारी आहे.
दो ऒर दो पांच या कथेमध्ये लेखकाने ग्रामीण भागातील विद्यार्थी लगतच्या शहरात शाळा शिकण्यासाठी गेल्यावर त्यांच्या सोबत घडणा-या घटना विनोदी शॆलीत साकारण्याचा चांगला प्रयत्न केल्यामुळे कथा चांगली खुलली आहे.
तुका सभापती या कथेमध्ये गावातील एक उचापतीखोर तरुण गावातील सामाजिक सांस्कृतिक व राजकिय परिस्थितीचा लाभ करुन घेत असतो.त्याचे वर्णन अजित काटकर यांनी ग्रामीण विनोदी पद्धतीने साकारुन विनोदी कथेची निर्मिती केली आहे कथा चाचणीत झाली आहे.
चिडकं वाघापुर या कथेत ग्रामीण भागात होणा-या विविध स्पर्धामध्ये गावातीलच संघ कसा जिंकेल याची खबरदारी पंच कमिटी घेत असताना होणारे विनोद मांडले आहेत त्यामुळे कथा रंजक झाली आहे.
सिनेमात काम करायचे या वेडापायी एखाद्याच्या आयुष्याची कशी धुळदान होते हे सिनेमाचा तमाशा या कथेतुन अजित काटकर सरांनी अगदी चपखल पद्धतीने रंगवले आहे.भोळ्या भाबड्या आई वडिलच्या पेशावर शहरात शिक्षणासाठी राहून वेगळेच उद्योग करणारा रंगराव आपणास या कथेत भेटेल तर त्याचे त्याला कोणते फळ मिळते तेही वाचावयास मिळेल.
नरकपुरीतील उत्सवोत्सव ही विडंबनात्मक काल्पनिक विनोदी कथा आहे यामध्ये नरकपुरात गणेशोत्सवात नाटक साजरे करण्यासाठी पृथ्वीलोकातुन कलाकार आणले जातात व त्यांनंतरच्या घटना लेखकाने विनोदी शॆलीत मांडून वाचकांसमोर एक नवीनच विषय ठेवला आहे.
तंटामुक्ती अभियानाचा एका गावात कसा बोजवारा उडतो अध्यक व सदस्य निवडीच्या बॆठकीत हाणामारी होऊन प्रकरण पोलीसस्टेशनला जाते हे विनोदी शॆलीत चितारण्याचा चांगला प्रयत्न अजित काटकर यांनी केला आहे.
‘इरसाल भजनी मंडळ’ ही कथा प्रसांगानुरूप विनोद करणारी आहे. मित्राच्या अंत्ययात्रेत भजन म्हणणाऱ्यांना दारू पिऊन तर्र झाल्यामुळे भान रहात नाही. त्यामुळे घडणारे विनोद या कथेत शब्दबद्ध केले आहेत.विनोदी कथेसाठी ‘अणू’ सापडला की त्याचे हास्यस्फोटात रूपांतर करण्यासाठी लेखकाला खूप मेहनत घ्यावी लागते. तशी मेहनत अजित काटकर यांनी घेतलेली आहे. त्यांच्या कथा आणखीन खुलवण्यासाठी वाव आहे. लोणच्यासारखा कथाविषय मुरायला हवा अर्थात लेखक जसा जसा मुरत जाईल तसतसे त्यांचे लेखन चविष्ट होत जाईल.
अजित काटकर हे कथाविषय मुरवण्याची प्रक्रिया चालू ठेवतील आणि त्यांच्या लेखणीतून अधिकाधिक चटकदार कथा जन्माला येतील अशी चिन्हे प्रस्तूत कथासंग्रहातील कथा वाचून वाटते.
या पुस्तकाच्या प्रकाशनाची जबाबदारी कोल्हापूर येथील प्रतिथयश प्रकाशक त्रिभुवणदास जोशी यांच्या अभिनंदन प्रकाशन यांनी स्विकारुन अजित काटकर सरांचा एक छान असा कथासंग्रह आपणासमोर ठेवला आहे.
अजित काटकरांच्या भावी लेखनास माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा !
रविकुमार मगदुम
संपादक दिवाळी आवाज विटा.