भरारी… क्रांतिवीर शैक्षणिक संकुल, म्हसवडची…
व्हिजन २४ तास (संपादक :अहमद मुल्ला )
भरारी…
क्रांतिवीर शैक्षणिक संकुल, म्हसवडची…
“निवडुंगाच्या रोपासारखं खडकावर उमलता आलं पाहिजे
निर्भिडपणे निर्धाराच्या वाटेवर चालता आलं पाहिजे वादळांचं काय… ती येतात आणि जातात;
मातीत घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे.‘ “
असे जीवनगणित हजारो मुलांना शिकवणारे कृषि विकास प्रतिष्ठान देवापूर संचलित क्रांतिवीर शैक्षणिक संकुल. सन २००० साली या संस्थेची स्थापना झाली. आणि २००१ साली श्री सिद्धनाथाच्या पावन भूमीत ‘सिध्दनाथ बालक मंदिर’ (बालवाडी लहानगट ) सुरु करण्यात आले. तर २००३ साली इ. पहिलीचा वर्ग सुरु झाला.
गुणवत्तापूर्ण शिक्षणाला संस्कारक्षम बनवून म्हसवड पंचक्रोशीतील घराघरात उज्ज्वल भविष्याची ज्ञानगंगा पोहचवण्यासाठी संस्थेतर्फे धाडसी निर्णय घेतला उमलल्या युवा पिढीचे मन, मनगट व मेंदू गतिमान करुन त्यांना गुणवंत व यशवंत करण्याचे ध्येय संस्थेने ठेवले आहे. दगडातील देव शोधण्यापेक्षा माणसातील देव असणा-या थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नावाने शाळा सुरु झाली.
संस्थेने क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी प्राथ. शाळा म्हसवड या शाळेसाठी गावाबाहेर दीड किलोमीटर अंतरावर साडेतीन एकर जमीन खरेदी केली आणि त्याठिकाणी शाळेसाठी स्वतःची स्लॅबची इमारत २००५ साली बांधण्यात आली. या इमारतीचे उद्घाटन तात्कालीन केंद्रीय मंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण बाबा तसेच महाराष्ट्राचे तात्कालीन कृषि मंत्री मा.बाळासाहेब थोरात यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. प्रथम इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग व त्यात पुढे इयत्ता सातवी पर्यंत वाढ करण्यात आली.
लाख लाख नजरांवरती कर्तृत्ववानाचं राज्य असतं, स्वतःच्या जखमा पुसून समाजहितासाठी झगडायचं असतं… असे स्वतःच्या अडीअडचणी बाजूला सारुन शाळेच्या विकासासाठी, शाळेच्या प्रगतीसाठी आणि सदैव गणवत्तेसाठी झटणारे संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांची दुरदृष्टी; मुख्याध्यापिका व संस्था सचिव सौ. सुलोचना बाबर यांची जिद्द व चिकाटी तसेच पालकांच्या विश्वासाला पात्र ठरलेली शाळा म्हणून क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी प्राथमिक शाळेचा नावलौकीक वाढतच राहीला. नेहमीच दुष्काळाच्या वास्तव्यात असलेला माण तालुका आणि उसतोड, रंगकाम, मेढपाळ, मातीकामानिमित्त होणारे स्थलांतर हा माण तालुक्याला लागलेला शाप आहे. माणमध्ये नैसर्गिक दुष्काळ असला तरी या ठिकाणी बुध्दीचा मात्र सुकाळ आहे. क्रांतिवीर शाळेतील विद्यार्थ्यांनीसुध्दा हे दाखवुन दिले आहे. शालेय शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परीक्षेत शाळेने तालुक्यातच नव्हेतर सातारा जिल्हात स्वतःचे वगळे अस्तित्व निर्माण केले.
पालक व बालकप्रेमी, नवनवीन शैक्षणिक प्रयोग करणारी, गुणवत्ता वाढीचा मंत्र जपणारी शाळा म्हणून क्रांतिवीर शाळा अल्पावधीतच नावारुपास आली आहे. पुढे पालक व विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन संस्थेतर्फे माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. ‘आत्मगिरी माध्यमिक विद्यालय’ ही स्थलांतरीत व हस्तांतरीत माध्यमिक विद्यालय म्हसवड येथे सुरु केल्याने विद्यार्थ्याना इयत्ता दहावी पर्यतची शिक्षण सुविधा उपलब्ध झाली. “want’s are unlimited” या उक्तीप्रमाणे पालक, विद्यार्थी व संस्था व्यवस्थापनाच्या अपेक्षा व गरजा वाढल्याने नूतन मराठी प्राथमिक शाळा; पुढे क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेज (विज्ञान शाखा) म्हसवड सुरु करण्यात आल्या. ज्युनिअर कॉलेजसाठी वेगळेपण व विद्यार्थी हित जपण्यासाठी क्रॉप सायन्स (२०० गुण) व आय. टी. हे वैकल्पिक विषय सुरु केल्याने प्राथमिक, माध्यमिक शाखेप्रमाणेच क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेज, म्हसवड सुध्दा अल्पावधीतच नावरुपाला आले.
मात्र एवढ्यावर थांबतील ते कार्यक्षम संस्थापक व हितचिंतक पालक कसले? पालकांकडुन इंग्रजी माध्यम शाळेची मागणी पुढे आली अन पाहता पाहता संस्थापक कृषिरत्न विश्वंभर बाबर यांनी क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम स्कूल, म्हसवडसाठी इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतची मान्यता मिळविली. त्यातच पुन्हा पालकांकडून आपले विद्यार्थी NEET व JEE मध्ये चमकले पाहिजेत यासाठी संस्थेतर्फे सी.बी.एस.ई. पॅटर्नची शाळा सुरु करण्याची मागणी पुढे करण्यात आली. पालकांच्या मागणीचा विचार करुन संस्था विश्वंभर बाबर, संस्था सचिव सुलोचना बाबर व व्यवस्थापनाने C.B.SE. पॅटर्न शाळा मान्यतेच्या दृष्टीने विचार विनिमय सुरु केलेला आहे.
सी.बी.एस.ई. पॅटर्न शाळेसाठी आवश्यक व सर्व सोयींनी युक्त २७ हजार चौरस फुट इमारतीचे काम प्रत्यक्षात सुरु केले मात्र दरम्यानच्या कालावधीत राज्यात व देशात कोरोना महामारी आली आणि सर्वकाही अस्थिर झाले. संस्थेअंतर्गत सर्व शाळा शाखेचे अर्थकारण विस्कळीत झाले मात्र संस्था व्यवस्थापनाने परिस्थितीवर मात करण्यात निर्धार केलेला होता.
कोरोना महामारीचा कालावधी काही काळ संस्थेसाठी संधी निर्माण करुन गेला. पाहता पाहता प्रशस्त इमारतीचा एकावर एक मजला पुर्ण होत बांधकाम पुर्णत्वाकडे गेले. इमारत बांधकामापेक्षा अंतर्गत प्रयोगशाळा, वायरिंग, कंपाऊंड, रंगकाम इ. बाबी भल्या मोठ्या कर्ज रकमेशिवाय पूर्ण होणे शक्य नव्हते. संस्थाप्रमुखांची जिद्द, चिकाटी व उभी केलेली अपूर्ण इमारत पाहून मदतीचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष तसेच कर्जपुरवठ्याचे अनेक होत पुढे आले अन् सर्व सोयींनी युक्त अशा भव्यदिव्य इमारतीचे स्वप्न सत्यात उतरले.
सदर इमारत पूर्ण होण्याच्या कालावधीत सी.बी.एस.ई. पॅर्टनचा प्रस्ताव केंद्रसरकारकडे केला. तपासणीसाठी केंद्रीय तज्ञांची टीम आली. संस्था व्यवस्थापनासह सर्व शिक्षक सहकारी धास्तावले होते. मात्र या केंद्रीय तपासणी पथकाने उत्कृष्ट व्यवस्थापनाबाबत गौरव उद्गार काढल्याने सर्वांच्या जीवात जीव आला. अन् अखेरीस पालकांच्या सी.बी.एस.ई. पॅटर्न शाळेची मागणी पुर्ण झाली.
सन २००० साली सुरु केलेली सिध्दनाथ बालक मंदिर बालवाडी; क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी प्राथमिक शाळा, म्हसवड, नूतन मराठी प्राथमिक शाळा, म्हसवड; आत्मगिरी माध्यमिक विद्यालय, म्हसवड; क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेज, म्हसवड तसेच क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम स्कूल (C.B.S.E. ) म्हसवड इत्यादींच्या माध्यमातून हे “क्रांतिवीर शैक्षणिक संकुल, म्हसवड” कधी नावारुपास आले हे कळले सुध्दा नाही.
आज क्रांतिवीर शैक्षणिक संकुल, म्हसवड मध्ये एकूण १८५० विद्यार्थी शिकत आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. विद्यार्थी संस्कारक्षम व सर्वगुणसंपन्न करण्यासाठी संकुलात उच्चविद्याविभुषित व तज्ञ ५५ शिक्षक तसेच ५ शिक्षकेतर असे एकूण ६० कर्मचारी कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी संस्थेच्या ६ स्कूल बसेस तर खासगी व्यक्तीच्या १० बसेस विद्यार्थी वाहतूक सेवा करीत आहेत.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुला अंतर्गत इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी चा निकाल सलगपणे १०० टक्के लागत असला तरी जास्तीत जास्त विद्यार्थी उच्च गुण श्रेणीत राहतील यासाठी संस्था व शिक्षक कटिबध्द असतात. इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परिक्षेत या संकुलातील विद्यार्थी नेहमीच आघाडीवर असतात. याशिवाय राष्ट्रीय स्तरावरील एन.टी.एस.ई. तर राज्य स्तरावरील एन. एम. एम. एस. या शिष्यवृत्ती परिक्षेत अनेक विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. आजतागायत ३० विद्यार्थी इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षेच्या गुणवत्ता यादीत चमकले आहेत. तर इ. ८ वी शिष्यवृत्ती परिक्षेत १२ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
केवळ बौध्दीकच नव्हे तर क्रीडा कौशल्यातही संकुलातील विद्यार्थी अग्रेसर आहेत. अनेक खेळाडू जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर विविध क्रिडा स्पर्धांमध्ये चमकले आहेत. जिल्हास्तरीय थ्रोबॉल स्पर्धेत १४ वर्षे मुले या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. जिल्हास्तरीय गोळाफेक मध्ये २ मुलांनी सहभाग घेतला तर सॉफ्टबॉल स्पर्धेत १४ वर्षे मुले या संघाने तृतीय क्रमांक मिळवला. टेनिस क्रिकेटमध्ये १४ वर्षे मुले या संघाने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. आट्यापाट्या या स्पर्धेत १४ वर्षे मुली हा संघ राज्य स्तरावर सहभागी झाला. टेनिस क्रिकेटमध्ये राज्यस्तरावर ७ खेळाडू तर राष्ट्रीय स्तरावर २ खेळाडू चमकले. रोप स्किपिंग मध्ये राज्य स्तरावर २७ खेळाडू व राष्ट्रीय पातळीवर ५ खेळाडू चमकले.
इयत्ता १२ वी नंतर वैद्यकीय क्षेत्रातील M. B. B.S. या अभ्यासक्रमासाठी गेल्या ५ वर्षात एकूण ६ आणि B.A. M. S. ला २ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. देश सेवा व राज्यपोलिस सेवेत या संकुलातील एक डझन पेक्षा जास्त विद्यार्थी रुजु झाले आहेत. अशा रितीने सर्वच क्षेत्रात क्रांतिवीर शैक्षणिक संकुल नेहमीच अग्रेसर आहे.
आमच्या संस्थेचे अध्यक्ष प्रा. विश्वंभर बाबर स्वतः उच्चशिक्षित आहेत. त्यांनी कृषि क्षेत्रातील एम.एसस्सी. ॲग्री बी. एड. पदवी प्राप्त केलेली आहे. त्यांची दूरदृष्टी संस्थेसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरलेली आहे. कृषि, शिक्षण, सहकार, पत्रकारिता, वृक्षारोपण, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात प्रा. बाबर यांचे योगदान महत्वाचे आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना राज्यस्तरीय वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार; छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. कृषिरत्न पुरस्कार मिळवणारे विश्वंभर बाबर हे सातारा जिल्ह्यात एकमेव असून त्याचा आम्हाला रास्त अभिमान आहे.
आगामी २०२५ साल हे कृषि विकास प्रतिष्ठान संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष असून त्या अनुषंगाने संस्थेचे अनेक संकल्प पूर्णत्वाला येणार आहेत…
बलशाली भारत देशासाठी शक्तीशाली शतशा प्रणाम. ।। युवा ‘पिढी घडविणारे आमचे संस्थापक व या संस्थेला
सौ. पिसे सुभद्रा पोपट