आपदा मित्र प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
व्हिजन२४तासन्यूज म्हसवड
By ; Ahmad Mulla
सांगली :
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडून राज्यातील 20 जिल्ह्यामध्ये आपदा मित्रांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत ४५ आपदा मित्रांचे प्रशिक्षण कार्यक्रम शांतीनिकेतन, लोकविद्यापीठ सांगली येथे सुरू आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक, युवतींनी आपदा मित्र प्रशिक्षणासाठी संबंधित तहसिलदार कार्यालयात नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमाकरीता जिल्ह्यातील माजी सैनिक, राष्ट्रीय सेवा योजना, एन.सी.सी. विद्यार्थी, नेहरू युवा केंद्राचे युवक-युवती, होमगार्ड, पोलीस मित्र, अग्नीशमन विभागाकडील व्यक्ती व आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये कार्य करण्यास इच्छुक असणारे युवक, युवतीं नाव नोंदणी करू शकतात. प्रशिक्षणासाठी इच्छुक स्वयंसेवकाचे वय १८ वर्षे ते ४० वर्षापर्यंत असावे. प्रशिक्षणार्थी 12 दिवसांचे निवासी प्रशिक्षण पूर्ण करण्यास तयार असावा.
प्रशिक्षण कालावधीत तसेच प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रशासनामार्फत कोणतेही मानधन मिळणार नाही. प्रशिक्षणानंतर प्रशासनास आपत्कालीन प्रसंगी सहकार्य करण्यास तयारी असावी. आपदा मित्रांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच त्यांचा अपघाती विमा उतरविण्यात येणार आहे. यासंबंधी अधिक माहितीसाठी 0233-2600500 या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.