सातारा जिल्हा पोलीस दल आयोजित, गड भ्रमंती व स्वच्छता मोहिम जरंडेश्वर
व्हिजन २४ तास न्युज
BY सादिक शेख
गोंदवले खुर्द :
दिनांक २९/०१/२०२३ रोजी “आपले किल्ले आपली जबाबदारी” अनुषंगाने सातारा पोलीसदलामार्फत जरंडेश्वर या ठिकाणी गड भ्रमंती व स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये कोरेगाव उपविभागातील वाठार, रहिमतपूर, कोरेगाव, पुसेगाव या पोलीस ठाणेकडील,व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कोरेगावकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार
यांनी सहभाग घेतला होता. तसेच सातारा पोलीस दलातर्फे सदर मोहिमेबाबतची लिंक प्रसारित करण्यात आल्यामुळे सातारा जिल्हयातील नागरीक देखील मोहिमेमध्ये सहभागी झालेले होते. सदर मोहिमेदरम्यान जरंडेश्वर पायथा जांब बु. ता. कोरेगाव येथे एकत्रीत येवून चढाई (ट्रेक)
करण्यात आली तसेच समुह तयार करुन जरंडेश्वर मंदिर परिसर व पायथा येथे नियोजनबध्द स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. सदर मोहिमेदरम्यान गोळा करण्यात आलेला जैविक व अजैविक अंदाजे १४४ किलो कचरा गाडयामधून कचरा डेपोत पाठवण्यात आला. त्यानंतर
जरंडेश्वर मंदीर सभा मंडपात शिव व्याख्याता श्री. सुजित श्रीमंत काळंगे यांनी किल्ले संवर्धनाबाबत व सामाजिक विषयाबाबत व्याख्यान दिले.
सदर मोहिमेमध्ये श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा, श्री. बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा, श्रीमती अर्चना शिंदे, स.पो.नि., कोरेगाव पोलीस ठाणे, श्री. संजय बोंबले, स.पो.नि., वाठार पोलीस ठाणे, श्री. गणेश कड स.पो.नि., रहिमतपूर पोलीस ठाणे, श्री. बाळासाहेब
लोंडे पो.उ.नि., पुसेगाव पोलीस ठाणे असे १३ पोलीस अधिकारी, ८५ पोलीस अंमलदार व ७८ नागरीकांनी सहभाग घेतलेला होता. तसेच सातारा पोलीस दलामार्फत प्रत्येक रविवारी सातारा जिल्हयातील एक किल्ला निवडून सदरची मोहिम राबविण्यात येणार असून या मोहिमेमध्ये
नागरिक, व्यापारी व तरुणांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आव्हानही सातारा जिल्हा पोलीस दलाच्यावतीने करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे नवीन पिढीमध्ये इतिहासाबद्दल जनजागृती होण्यास देखील मदत होणार आहे.