काँग्रेस कार्यकर्त्यांनी’ हात से हात जोडो ‘अभियान यशस्वी करावे : रणजितसिंह देशमुख माण व खटावमधील सर्व गावांमध्ये पोहचणार

बातमी Share करा:

व्हिजन२४ तास न्यूज

म्हसवड :
     काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून दिलेला संदेश गावागावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी काँग्रेस पक्षाने ‘हात से हात जोडो’ अभियान सुरु केले आहे. हे अभियान माण व खटाव तालुक्यातील सर्व गावांमध्ये पोहोचविण्याचा नियोजनबध्द कार्यक्रम तयार केला असून कार्यकर्त्यांनी तो यशस्वी करावा, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे सचिव व हरणाई सहकारी सूत गिरणीचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी केले आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून संपूर्ण देशात ‘हात से हात जोडो’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या नियोजनासाठी माण व खटाव ब्लॉक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेश काँग्रेसचे सचिव राजेंद्र शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. प्रदेश प्रतिनिधी राजूभाई मुलाणी, मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीचे संचालक सत्यवान कांबळे  व माण-खटाव तालुक्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.
यावेळी बोलताना रणजितसिंह देशमुख पुढे म्हणाले, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ऐतिहासिक ठरली असून देशातील जनतेला भेडसावणाऱ्या अनेक ज्वलंत प्रश्नांना या पदयात्रेने ऐरणीवर आणले आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे देशात महागाई व बेरोजगारी वाढली असून याविरोधात संघर्षासाठी आणि देशातील जनतेमध्ये प्रेम, विश्वास व बंधुभाव निर्माण करण्यासाठी युवकांनी सज्ज व्हावे हा राहुल गांधींचा संदेश’ हात से हात जोडो’ अभियानाच्या माध्यमातून वाडीवस्तीवरील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकत्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन रणजितसिंह देशमुख यांनी यावेळी केले.
राजेंद्र शेलार यांनी हात से हात जोड़ो अभियानाची विस्तृत माहिती दिली.
शेलार म्हणाले, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर हा तीन हजार आठशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण करीत असून ३० जानेवारीला या पदयात्रेची श्रीनगर येथे सांगता होत आहे. त्यानंतर पुढील दोन महिने (१ फेब्रुवारी ते ३० मार्च) काँग्रेस पक्षातर्फे हात से हात जोडो अभियान प्रत्येक गावात राबविण्यात . येणार असून राहुल गांधी यांचे संदेशपत्र आणि मोदी सरकारच्या गैरकारभारावरील आरोपपत्र जनतेपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प राष्ट्रीय अध्यक्ष मलिलकार्जुन खरगे यांनी केला आहे. माण व खटाव तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते हा संकल्प निर्धारपूर्वक यशस्वी करतील, असा विश्वास राजेंद्र शेलार यांनी व्यक्त केला.
यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी चर्चा करुन अभियानाचा कार्यक्रम निश्चित केला. तालुकास्तरावरील दोन व जिल्हा परिषद गटनिहाय अकरा सभांचे नियोजन करण्यात आले. तसेच युवक काँग्रेसच्या वतीने सर्व गावांमध्ये मोटार सायकल रॅली काढण्यात येणार असून रॅलीचे मार्गही निश्चित करण्यात आले. तसेच दोन्ही तालुक्याचे अध्यक्षव प्रमुख १० पदाधिकारी प्रत्येक गावाला भेट देतील व जनतेशी संवाद साधतील. असा व्यापक
कार्यक्रम यावेळी निश्चित करण्यात आला
खटाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. संतोष गोडसे, माण तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने, सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमरजित कांबळे, शिवाजीराव यादव, अॅड. पी. डी. सावंत, राजेंद्र माने, रवींद्र शिंदे, संदीप चव्हाण, राहुल सजगने आदी पदाधिकारी व   प्रमुख कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!