व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड :
वडजल (ता. माण) येथील म्हसवड-मायणी रस्त्यालगत असलेल्या हॉटेल स्वराज किराणा अॅन्ड जनरल स्टोअर या दुकानाला १८ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून अंदाजे पाच लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे शेतकरी कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून सुरू केलेला व्यवसाय जळून खाक निखिल सुभाष काटकर यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून वडजल येथे किराणा व हॉटेलचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र, रात्रीच्या वेळी दुकानात शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. या आगीत कांद्याच्या विक्रीसाठी ठेवलेली १.२० लाखांची रोख रक्कम, इतर ३० हजारांची रोख रक्कम, तसेच फ्रिज, साखर, तेल, तांदूळ, चपलांचे ८९३ जोड, केक आणि इतर सामान असे एकूण साडेतीन लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.
परिस्थिती कठीण; भरपाईची मागणी आग लागल्याची कोणतीही चाहूल न लागल्यामुळे सकाळी दुकान उघडल्यावर ही घटना निदर्शनास आली. नुकसानग्रस्त निखिल काटकर यांनी गाव कामगार तलाठी श्रीमती काटरे यांच्या मदतीने पंचनामा केला आहे. शेतमजुरी व छोट्या व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला असून, शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी काटकर यांनी केली आहे.
आर्थिक मदतीची गरज या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. काटकर कुटुंबासाठी लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनीही केली आहे.