व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते कराड सातारा
सातारा: पाटण, कराड, माण तालुक्यातील मल्हार पेठ – उंब्रज – मायणी – दिघंची – पंढरपूर मार्ग (राज्य मार्ग क्रमांक 143) च्या रस्ते विकासासाठी महाराष्ट्र शासनाने 480 कोटींचा निधी मंजूर केला आहे.
शनिवारी या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी ऑनलाइन माध्यमातून भूमिपूजन केले.
प्रस्तावित प्रकल्पामध्ये 60 किमी लांबीच्या या रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार असून, या मार्गामुळे थेट पंढरपूरपर्यंतचा प्रवास सुलभ होणार आहे. या रस्त्यामुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांना फायदा होईल, तसेच भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन पर्यावरणपूरक उपाययोजना केल्या जाणार आहेत.
धैर्यशील कदम यांनी यावेळी सांगितले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी रस्ते सुशोभीकरणासाठी आणि ऑक्सिजन निर्मितीसाठी झाडे लावण्याच्या प्रयत्नांचीही घोषणा केली.
या भूमिपूजन सोहळ्यात रामकृष्ण वेताळ, संतोष रोकडे, राहुल अहिरे, राजेश धुमाळ आणि इतर अधिकारी उपस्थित होते.